विश्लेषण: वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ म्हणजे काय? ती कोणासाठी अनिवार्य?

१ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नव्या स्वरूपातील पाट्या बंधनकारक केल्या आहेत

वाहतूक गुन्हे किंवा इतर स्वरूपाचे गुन्हे केल्यानंतर पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहन क्रमांकांच्या पाट्यांमध्ये बदल केला जातो. नंबर बदलल्यामुळे अनेकदा वाहने सापडत नाहीत आणि दोषी पकडणेही अशक्य होते. या गुन्ह्यांची उकल करणे, वाहन अपघात झाल्यानंतर वाहनधारकाची संपूर्ण माहिती उपलब्ध करताना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बंधनकारक करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने नव्या स्वरूपातील पाट्या बंधनकारक केल्या. त्यामुळे आता १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. या नियमाचे पालन न केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात जुन्या वाहनांसाठी हा नियम नव्हता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर तो लागू करण्याचा विचार होत आहे. उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या सुविधेची नेमकी वैशिष्ट्ये काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.

उच्च सुरक्षा क्रमांक पाटी कशी असते?

उच्च सुरक्षा क्रमांक पाटी म्हणजे एक थ्रीडी होलोग्राम स्टीकर असून, ज्यावर वाहनाच्या इंजिनाचा क्रमांक आणि वाहनाचा चॅसी (सांगाडा) क्रमांक असेल. वाहनाची सुरक्षा आणि सुविधांना नजरेसमोर ठेवून या पाट्या तयार केलेल्या असतात. वाहन चोरीला आळा घालण्यासाठी आणि वाहन क्रमांक पाट्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. यामुळे वाहन क्रमांक पाट्यांमध्ये सहजी बदल करता येणार नाही, त्याच आकारही बदलता येणार नाही. या पाटीवर बारकोडही असतो. संबंधित बारकोड आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांनी स्कॅन केल्यास त्यांना वाहनांबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकते. पाटीवर एक इलेक्ट्रॉनिक चिप आणि गोपनीय क्रमांक असतो, तो वाहनाशी जोडलेला असतो. हा गोपनीय क्रमांक एकदा वाहन पाटीशी जोडला गेल्यानंतर दोन्ही बाजूने लॉक होतो. त्यानंतर कोणीही ते लॉक उघडू शकत नाही. या पाट्या अॅल्यूमिनियम मिश्र धातूपासून बनवलेल्या असतात. ती वाहनाला कायमस्वरूपी असल्याने बदलली जाऊ शकत नाही. नवीन पाटी ही बदललेल्या जागीच लावता येते.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

वाहन क्रमांक पाटीची ‘उच्च सुरक्षा ’ कशी?

वाहने चोरी होणे, वाहन अपघात व गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ महत्त्वाची ठरणारी आहे. उच्च तंत्रज्ञान वापरून या क्रमांक पाटीवर बारकोड,‘इलेक्ट्रॉनिक चिप’ तसेच ‘सेन्सर’ लावण्यात येतात. त्यात वाहनधारकांची संपूर्ण माहिती असते. त्याचा गैरवापर होत असेल, तर बारकोड आणि सेन्सरमुळे संबंधित प्रशासनाला त्याची माहिती लगेच मिळण्यास मदत होते. चोराने वाहनाची पाटी काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकाच्या मोबाइलवरही मिळू शकतो. केंद्र सरकारने देशभरात १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या नवीन वाहनांना अशी पाटी असणे बंधनकारक केले. महाराष्ट्रात जुन्या वाहनांना हा नियम अदयाप लागू करण्यात आला नसून त्यावर विचार विनिमय सुरू आहे.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

जुन्या वाहनांसाठी काय नियमावली?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८मध्ये वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या बसवण्याचा निर्णय घेतला होता. या पाट्या नेमक्या कशा असाव्यात. त्यावर काय माहिती असावी, पाटीचा आकार कसा असावा, याबाबतचे सर्व निकषही ठरविण्यात आले. नव्या वाहनांना उत्पादकांनी किंवा वितरकांनी या पाट्या बसवून देणे बंधनकारक करण्यात आले आणि १ एप्रिल २०१९पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. १ एप्रिलनंतरच्या वाहनांना या पाट्या आहेत की नाहीत, हे नोंदणीच्या वेळी तपासण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आल्या. त्याशिवाय वाहनांची नोंदणी होणार नाही, असेही नमूद करण्यात आले. त्यानुसार उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या असलेली वाहने येऊ लागली. नुकताच केंद्राने जुन्या वाहनांसाठी नवीन नियम आखला आहे. नवीन नियमांनुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी आणि कलर कोडेड स्टीकर्स अनिवार्य करण्यात आले आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटीसाठी अर्ज कसा कराल?

वाहनधारकांना शासनाच्या अधिकृत नोंदणी संकेतस्थळावर (bookmyhsrp.com) वाहन क्रमांक, चॅसी क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता, संपर्क, इंधन प्रकार इत्यादी माहिती भरावी लागणार आहे. वाहन खासगी वापरासाठी असल्यास प्रदर्शित वाहन वर्ग पर्यायाखालील ‘नॉन-ट्रान्सपोर्ट’ वर क्लिक करावे आणि हा अर्ज सादर करावा. त्यानंतर वाहनधारकाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक वापरकर्ता नाव आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर शुल्क भरण्यासाठी दिलेले वापरकर्त्याचे नाव आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे. शुल्क भरल्याची पावती मिळेल. वाहनाचा उच्च सुरक्षा क्रमांक तयार होताच, वाहनधारकाला मोबाइल क्रमांकवार त्याबद्दल सूचना मिळेल.

हे वाचले का?  Kolkata Rape Case : पीडितेच्या शरीरावर १४ जखमा, फुफ्फुसात रक्तस्राव तर गुप्तांगात आढळला चिकट द्रव्य; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर!

उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटीसाठी खर्च किती?

उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी हवी असल्यास त्यासाठी वाहनधारकाला थोडा खर्च सोसावा लागेल. त्यासाठी दुचाकींसाठी ४०० रुपये ते चारचाकी वाहनांसाठी ११०० रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. ते कोणत्या श्रेणीशी संबंधित आहेत यावरही अवलंबून आहे. वाहन मालकाला कलर-कोडेड स्टिकर (पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी चालित इंजिन ओळखण्यासाठी) मिळवण्यासाठी १०० रुपये द्यावे लागणार आहेत.

सुशांत मोरे