विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत अंतिम फेरीत

सोनिया, मनीषा यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित

जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या सिम्रनजीत कौरने (६० किलो) शुक्रवारी युक्रेनच्या मरियाना बॅसानेटसचा पराभव करून जर्मनीत सुरू असलेल्या कॉलोग्न विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

आशियाई रौप्यपदक विजेत्या सिम्रनजीतने मरियानाला ४-१ असे पराभूत करीत शनिवारी होणाऱ्या सुवर्णपदकाच्या लढतीमधील स्थान निश्चित केले.

त्याआधी, दोन वेळा जागतिक पदक विजेत्या सोनिया लाथेरने (५७ किलो) युक्रेनच्या स्निझहाना खोलोडकोव्हाचा ३-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. मनीषाला पुढे चाल मिळाल्याने उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले आहे.

हे वाचले का?  IND vs NZ : विराटने शून्यावर बाद होऊनही मोडला धोनीचा मोठा विक्रम, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय खेळाडू

आशियाई कांस्यपदक विजेत्या सतीश कुमारने (+९१ किलो) मोल्डोव्हाच्या झ्ॉव्हँटिन अ‍ॅलेक्सेनचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली आणि कांस्यपदकाची निश्चिती केली आहे. मोहम्मद हुसामुद्दीनने (५७ किलो) जर्मनीच्या उमर बाजवाला ५-० असे नामोहरम करीत अंतिम चौघांमध्ये स्थान मिळवले. ५७ किलो गटात राष्ट्रकुल विजेत्या गौरव सोलंकीने मुरत यिल्डिरिमचा पराभव केला. आशियाई रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारचे (७५ किलो) आव्हान संपुष्टात आले. नेदरलँड्सच्या मॅक्स व्हान डर पासने उपांत्यपूर्व फेरीत त्याचा पराभव केला.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

आशियाई क्रीडा स्पर्धेमधील विजेत्या आणि जागतिक रौप्यपदक विजेत्या अमित पंघालने गुरुवारी ५२ किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत भारतासह जर्मनी, बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, फ्रान्स, मोल्डोव्हा, नेदरलँड्स, पोलंड आणि युक्रेन या देशांचे संघ सहभागी झाले आहेत.