शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या “महाराष्ट्राचा एक दौरा…”

शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात, सुप्रिया सुळेंचं सूचक विधान

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

“निवडणुकीत काय होतं हे आमच्यापेक्षा जवळून कोणी पाहिलेलं नाही. शरद पवारांचं ५५ वर्षांचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्यात जितके चढ आहेत तितकेच उतार आहेत. ५५ वर्षांतील २७ वर्ष ते सत्तेत आणि २७ वर्ष विरोधात होते. पण मी नेहमी त्यांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे सांगते. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं,” अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात,” असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केली.

“महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं सगळे म्हणत होते. रोज सकाळी उठलो की आज पक्ष सोडून कोण गेलं पहायचे. कोणी गेलं नाही तर संध्याकाळी सुटकेचा निश्वास सोडायचो. दुसऱ्या दिवशी परत बातमी असायची. इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता. त्यानंतर दोन्ही खिशात काही नाही असं होतं. पण शरद पवार सोलापूरला गेल्यानंतर जी कुस्ती सुरु झाली, ती निकालाच्या दिवशीच संपली,” असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!