शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? विचारणाऱ्या काँग्रेसला संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले….

संजय राऊतांच्या युपीए अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नाराज

युपीएचं नेतृत्व शरद पवारांनी करण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेत्यांनी नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांनी आपला संबंध नाही त्या विषयात पडू नये असा सल्लाच दिला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं असून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे. तसंच या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भाष्य केल्यास आपण त्यांना उत्तर देऊ असंही सांगितलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना काँग्रेसने आधी त्यांनी युपीएमध्ये सामील व्हावं असा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी यूपीएचं नेतृत्व करावं या संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेत शिवसेना यूपीएचा घटक पक्षही नाही, संजय राऊत यांना यूपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही, असे खडे बोल नाना पटोले यांनी सुनावले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? असा चिमटाही त्यांनी काढला होता.

संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “शरद पवार या देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. युपीएसंबंधी बोलण्यासाठी युपीएमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. युपीए राज्याचा विषय नाही, त्यामुळे राज्यातील, जिल्हा स्तरावरील लोकांनी केंद्रीय विषयावर बोलू नये. हा राष्ट्रीय विषय असून राष्ट्राच्या हितासाठी या देशात एका मजबूत विरोधी पक्षाची आघाडी स्थापन व्हायची असेल तर मी सांगितलेल्या भूमिकांवर चर्चा होणं गरजेचं आहे. हे जर महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे”.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा दिल्लीतील चर्चेचा विषय असून महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये ती होऊ नये. राष्ट्रीय विषय दिल्लीत चर्चिला जातो आणि तिथेच झाली पाहिजे. या विषयावर सोनिया गांधी, राहुल गांधी बोलणार असतील तर आम्ही त्यांना उत्तर देऊ. पण ते सुद्धा या विषयावर काही बोलत नसून चिंतन करत आहेत”.

“माझ्यावर कोणी टीका करत नसून ते आपल्या पक्षावरच टीका करत आहेत. या देशात जर एक उत्तम विरोधी पक्षांची आघाडी निर्माण झाली नाही तर तुम्ही भाजपाचा पराभव कसा करणार याचं उत्तर मला प्रश्न विचारणाऱ्यांनी द्यायला हवं. ते दिल्लीत येऊन द्यावं, महाराष्ट्रात देऊ नये. हा विषय राष्ट्रीय आघाडीचा आहे, राष्ट्रीय राजकारणातील आहे. जिल्हा किंवा तालुक्यातील नाही हे समजून घेतलं पाहिजे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत. युपीए मजबूत होऊ नये असं जर काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकांना वाटत असेल तर त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणीदेखील त्यांनी केली.

हे वाचले का?  Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!

युपीए २ ची गरज वाटते का? विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आतापर्यंत तिसरी, चौथी, पाचवी आघाडी अशा नौटंकी झाल्या आहेत, त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे जी आताची आघाडी आहे ती कशी मजबूत होईल हे पाहणं गरजेचं आहे. दिल्लीतील काही लोक युपीए-२ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत म्हणून त्या चिंतेनं मी हे सांगितलं आहे”.

“यड्रावकर यांनी केलेला गौप्यस्फोट नाही कारण हे सर्वांना माहिती होतं. यड्रावकर किंवा इतर आमदारांशी रश्मी शुक्ला स्वत: संपर्क करुन नव्याने निर्माण होणाऱ्या ठाकरे सरकारसोबत जाऊ नका, भाजपा सरकारसोबत जा…तुमच्या सर्वांच्या फाईली तयार आहेत अशा धमक्या दिल्या जात होत्या. हे सर्वांना माहिती होतं. तरीही त्या महिला अधिकारी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढील ते पाच ते सहा महिने त्याच पदावर होत्या याचं आश्चर्य वाटतं. राजकारणात एवढा विश्वास कोणावर ठेवू नये. हात पोळले असताना असे दोन ते तीन अधिकारी आमच्या नजरेत आले होते. सरकार स्थापन होत असताना अशा अधिकाऱ्यांना जवळ ठेवू नये अशी शरद पवारांचीही भूमिका होती. तसं केलं असतं तर जे कागद घेऊन विरोधी पक्षनेते दिल्लीला आले होते ती संधी त्यांना मिळाली नसती. यामधून शहाणपण घेतलं असेल असं समजूयात,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारनं थांबवला, नवे अर्जही स्वीकारणं बंद; नेमकं कारण काय?

“युतीचं सरकार आल्यानंतर बाळासाहेबांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावून मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे आजही जुन्या सरकारशी निष्ठा ठेवून आहेत, तुम्हाला राज्य करु देणार नाहीत, अडचणी निर्माण करतील असं बजावलं होतं. यानंतर तात्काळ त्यांची बदली करा किंवा रजेवर पाठवा अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांना मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांनी ताबडतोब रजेवर पाठवलं होतं,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.