शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम

सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या जमीन मंजूर आदेश प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

नाशिक : शहीद जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर येथील वीर माता किसनाबाई बोडके यांना जमीन मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुपूर्द केला. शहीद जवानास योग्य श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान असल्याचे मांढरे यांनी सांगितले. 

सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या जमीन मंजूर आदेश प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार राजेंद्र नजन, वीरमाता किसनाबाई बोडके, वीरपिता श्रीकृष्ण बोडके, प्रीती बोडके, सुरेश कातकाडे आदी उपस्थित होते. देशाच्या सीमेवर कार्यरत असताना देशासाठी बलिदान केलेल्यांप्रती शासनाची भूमिका अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यातील आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर काम सुरु असून त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

२४ सप्टेंबर २००२ मध्ये जम्मू काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत असताना श्रीकांत बोडके यांना वीरगती प्राप्त झाली.  आज त्यांच्या नातेवाईकांकडे जमीन मंजूर आदेश देण्यात आले.

वीरमाता किसनाबाई बोडके यांनी शहीद मुलाची नेहमीच आठवण येत असल्याचे नमूद केले. मुलाने जिवंतपणी आई-वडिलांसाठी काही करणे हा नियमच आहे. मात्र माझा श्रीकांत देशासाठी शहीद झाला याचा अभिमान वाटतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

हे वाचले का?  नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान