शाळा बंद, मग क्रीडा अनुदान गेले कुठे?; पालकांची विचारणा; क्रीडा विभागाकडून शाळांची तपासणी करत कामाची पाहणी केल्याचा दावा

शाळेच्या इमारतीत अथवा भौतिक सुविधेत सुधारणा नसल्याची अनेक उदाहरणे आहेत.

नाशिक : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वरिष्ठ पातळीवरून वेगवेगळी अनुदाने जाहीर होतात. यापैकी क्रीडा अनुदान एक. दीड वर्षाहून अधिक काळापासून शाळा बंद असताना शाळा स्तरावर प्राप्त झालेल्या क्रीडा अनुदानाचा विनियोग जिल्ह्यात कसा झाला, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. दुसरीकडे, क्रीडा विभागाने अनुदान वितरणानंतर संबंधित शाळांची तपासणी करत कामांची पाहणी करण्यात आल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील अनेक शाळांची अवस्था दयनीय आहे.  शाळेच्या इमारतीत अथवा भौतिक सुविधेत सुधारणा नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या भौतिक सुविधा मिळून प्रसन्न शैक्षणिक वातावरण तयार व्हावे, यासाठी विविध अनुदाने दिली जातात; परंतु कागदोपत्री खर्च दाखवून रकमेचा अपहार होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट या कालावधीत काही शाळांना क्रीडा अनुदान वाटप झाले. त्या अनुदानाचा उपयोग शाळा बंद असताना कुठल्या कामासाठी झाला, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या अनुदानाचा विनियोग कसा झाला, हे तपासण्यासाठी  जिल्हास्तरीय तपासणी पथकही अद्याप गठित करण्यात आलेले नाही.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

काही शाळांना क्रीडा अनुदानअंतर्गत सहा ते सात लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. शाळा बंद असताना मैदानाची दुरुस्ती, नवे क्रीडा साहित्य किंवा अन्य काही व्यवस्था शाळास्तरावर झालेली नाही; परंतु पालकांकडून होणारे आरोप क्रीडा विभागाने फेटाळले आहेत. काही कामे झाली असून काही अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले.

क्रीडांगण विकास अनुदान योजना

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

जिल्ह्यात क्रीडासंस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार आणि जोपासना करण्यासाठी तसेच  खेळविषयक सुविधा निर्माण करण्याकरिता जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, धवनपथ तयार करणे, क्रीडांगणास कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अनेक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह आणि कपडेबदल खोली बांधणे, पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर प्रकाशझोताची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा व सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी आणि आसन व्यवस्था तयार करणे, क्रीडांगणाभोवती गटार व्यवस्था करणे, मैदानावर पाणी मारण्यासाठी यंत्रणा बसविणे, मैदानावर सपाटीकरणासाठी यंत्र खरेदी करणे आदींसाठी अनुदान मंजूर करण्यात येत असते.

शाळांमध्ये अनुदान वितरित झाल्यानंतर सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली आहे. विद्यार्थी या काळात शाळेत नसल्याने शांततेत कामे झाली. बहुतांश शाळांमध्ये क्रीडांगण दुरुस्ती, संरक्षण भिंत बांधणे यासह अन्य कामे करण्यात आली. काही कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकरच पूर्ण होतील.  – पल्लवी धात्रक (जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक)