करोना महामारी आणि टाळेबंदीमुळे सुमारे नऊ महिन्यांपासून शाळा बंद होत्या.
जू.स. रुंग्टा विद्यालयात विद्यार्थ्यांचीअशी तपासणी करुन वर्गात सोडण्यात येत होते. (छाया- यतीश भानू)
नाशिक : राज्य शासनाच्या निर्णयानुसार बुधवारपासून जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर सुरू झाले. शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्याआधी करोनाविषयक नियमांचे शाळाकडून काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षक, शिक्षके तर कर्मचाऱ्यांना मुखपट्टी बंधनकारक करण्यात आली आहे.
करोना महामारी आणि टाळेबंदीमुळे सुमारे नऊ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. टाळेबंदी शिथिलीकरणाने वेग घेतल्यानंतर राज्य शासनाने प्रारंभी नववी ते १२ वीचे वर्ग सुरू के ले. त्यानंतर बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. शहरातील पालक करोना संसर्गाच्या भीतीने अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास फारसे उत्सुक नाहीत. ग्रामीण भागात नेमके उलट चित्र आहे. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक शाळा सुरू करण्यास उत्सुक दिसले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या एक हजार ३०, खासगी व्यवस्थापनाच्या एक हजार ४९ अशा दोन हजार ७९ शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषद तसेच खासगी शाळेत पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सात हजार २४३ शिक्षकांना शाळेत यावे लागणार आहे. शहर परिसरात महापालिके च्या १०२ तर खासागी व्यवस्थापनाच्या ३०३ शाळा सुरू झाल्या.शाळेच्या पहिल्या दिवसाविषयी पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती.