शाळेतील विद्यार्थ्यांची यादी जातीसह जाहीर, साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमधील प्रकार

शाळेच्या तुकड्या करताना विद्यार्थ्यांच्या जातीसह याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये उघडकीस आला आहे.

वाई: शाळेच्या तुकड्या करताना विद्यार्थ्यांच्या जातीसह याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये उघडकीस आला आहे. यानंतर शाळेच्या निषेधार्थ विविध संघटनांसह पालकांनी आंदोलन केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत चौकशीचा आदेश दिला आहे.

साताऱ्यातील निर्मला कॉन्व्हेंट स्कूल या मिशनरी शाळेकडून नवीन वर्षाच्या तुकड्या करताना विद्यार्थ्यांचा जातीसह उल्लेख करून याद्या पालकांना पाठवण्यात आल्या. ही बाब उघडकीस येताच पालक संतप्त झाले. त्याचा सर्व स्तरांवरून निषेध सुरू होत पडसाद उमटू लागले आहेत. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी बंद शाळेच्या फाटकाला निषेधाचे पत्र लावत आंदोलन केले.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करत सातारकर संतप्त झाले असून, सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले. सर्वत्र निषेध केला जात असताना शाळेकडून अद्याप कोणताही खुलासा न आल्याने संताप वाढला आहे. सकाळी हिंदुत्ववादी संघटना निर्मला स्कूलसमोर जमा होऊ लागताच शहर पोलिसांची कुमक तेथे पोहोचली. संतप्त लोक आंदोलनाच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना आचारसंहितेचे कारण देऊन रोखले. त्यावर कार्यकर्त्यांनी घोषणा देत शाळेच्या बंद गेटला ‘निषेधाचे पत्र’ डकवून संताप व्यक्त केला. हा प्रकार चुकून झाला आहे, की धर्म परिवर्तन करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो अशी बाब हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनाही धक्का बसला. याची पूर्ण चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सजग पालक फाउंडेशन, काही शिक्षक संघटना या शाळेविरोधी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

हे वाचले का?  सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित