शिक्षकांना ‘अ‍ॅप’चा ताप

शिक्षण बाकामांमुळे शिक्षकांचा ताण वाढला

शिक्षण बाकामांमुळे शिक्षकांचा ताण वाढला

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण देण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फर्मान काढले आहे. दोन्ही प्रकारांसाठी शिक्षकांना अध्यापनाचे काम करावयाचे आहे. अशातच अध्यापनासाठी शिक्षकांना विविध अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तगादा लावला जात असल्याने शिक्षकांचा ताप व ताण वाढला आहे.

अलीकडेच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत कोबो कनेक्ट अ‍ॅपद्वारे शाळांची इत्थंभूत माहिती शिक्षकांमार्फत या अ‍ॅपमध्ये भरावयाची आहे. मात्र हीच माहिती शासनाच्या सरल व यू-डायस पोर्टलवर भरायचे असल्याने एकच माहिती वारंवार भरण्याचा तगादा लावल्यामुळे शिक्षकांवरील ताण वाढला असल्याचे शिक्षक सांगत आहेत. जिल्हा शिक्षण विभागाने शिक्षकांना ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी सांगितल्यानंतर शिक्षकांमार्फत अभ्यासक्रम शिकवण्यासाठी सुरुवात केली गेली.

सध्याच्या घडीला पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेटचा अभाव व विद्यार्थ्यांकडे अद्ययावत मोबाइल नसल्यामुळे शिक्षकांमार्फत त्यांना स्वाध्याय पुस्तिका व प्रश्नमंजूषा गृहभेटी देऊन घरोघरी विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. या कामात शिक्षक गावातील सुशिक्षित शिक्षकमित्रांची मदत घेत आहेत. मात्र या प्रश्नमंजूषा व स्वाध्याय पुस्तिका प्रशासनामार्फत पुरवणे अपेक्षित असताना उलट शिक्षकच स्वनिधीतून हे विद्यार्थ्यांना पुरवीत आहेत.

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षकांना अनेक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. यामध्ये सलाम मुंबई, मानव संपदा अशा अनेक अ‍ॅपचा समावेश आहे. दर शनिवारी गोष्टीचा शनिवार, शाळा बाहेरची शाळा असे उपक्रमही शिक्षकांना राबवायचे आहेत. या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धनासाठी शिक्षकांनी समजून त्यानंतर विद्यार्थ्यांना तसे शैक्षणिक धडे द्यावयाचे आहेत. मात्र या अ‍ॅपनंतर अध्यापनाच्या वेळेलाच विविध प्रकारच्या वेबिनारमध्ये सहभाग घेऊन त्याला उपस्थिती दर्शवावी असेही तगादे शिक्षकांकडे लावले जात आहेत. हे वेबिनार दोन ते तीन तासांचे असल्यामुळे शिक्षकांनी या वेबिनारमध्ये सहभाग घ्यावा, की अध्यापनाचे काम करावे हे कळत नसल्याचे शिक्षकांमार्फत सांगण्यात येत आहे.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

हे सर्व उपक्रम प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले असले तरी या विविध माध्यमांचा ताप शिक्षकांना होत आहे, असेच दिसून येत आहे. बऱ्याच  शिक्षकांकडे अद्ययावत मोबाइल उपलब्ध नसल्याने हे अ‍ॅप डाऊनलोड करणे किंवा मोबाइलद्वारे वेबिनारमध्ये सहभाग घेणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी त्यांना यापासून मुकावे लागते व उपस्थिती न दर्शविल्यामुळे वरिष्ठांकडून बोल खावे लागल्याचे प्रकारही घडले आहेत.

उपस्थितीबबत शिक्षण विभागाचा दबाव

करोनाकाळ असो, निवडणूक असो किंवा इतर कामे व अलीकडेच शासनाने जाहीर केलेल्या खावटी योजनेमध्ये काही शिक्षकांचा सहभाग असणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. अध्यापनाबरोबरीने शिक्षकांना इतर कामांचा ताण मोठय़ा प्रमाणात असल्याने सद्य:स्थितीत अध्यापनाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कामाची विभागणी करून त्यानंतरच शिक्षकांकडे या उपक्रमाचा तगादा लावणे उचित ठरेल असे शिक्षक सांगत आहेत. शासनाने शिक्षकांना शालेय कामी ५० टक्के उपस्थिती सांगितली असली तरी शिक्षण विभाग १०० टक्के उपस्थितीसाठी दबाव आणत असल्याचेही सांगितले जात आहे.

हे वाचले का?  आदिवासी विद्यार्थ्यांना आता बोलीभाषेत शिक्षण, चौथीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे १२ स्थानिक भाषांमध्ये रूपांतर

बराच वेळ वाया

* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत शिक्षकांची ऑनलाइन प्रशिक्षणे शालेय कालावधीत घेतली जातात. त्यातच जिल्हा शिक्षण संशोधन परिषदतर्फे विविध ऑनलाइन प्रशिक्षणे या कालावधीत घेतली जातात.

* यामध्ये बराच वेळ जातो व अध्यापन रखडते. अशी प्रशिक्षणे सुट्टीच्या दिवशी घ्यावीत अशी मागणी होत आहे.