शिव मंदिरांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर

करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रथमच येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिव मंदिरे शिवभक्तांच्या गर्दीने गजबजली.

नाशिक : करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रथमच येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील शिव मंदिरे शिवभक्तांच्या गर्दीने गजबजली. ‘बम बम भोले’चा गजर करत भाविकांनी दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जमलेल्या गर्दीमुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर येथे गर्भगृह दर्शन बंद असले तरी सकाळी सहापासून रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहिल्याने त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. राज्य परिवहन महामंडळाची बस व्यवस्था नसल्याने सिटी लिंक किंवा अन्य खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत भाविकांनी त्र्यंबक गाठले. मंदिर परिसराला आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवतानाच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामीण पोलीस दक्ष होते.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

आठ अधिकारी, ८० अंमलदार, ४१ गृहरक्षक तसेच एक राज्य राखीव दलाची तुकडी हजर होती. त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त कुंड यासह त्र्यंबकेश्वरातील सर्व धार्मिक ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  देवस्थानच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम झाले.  महाशिवरात्रीनिमित्त परंपरेनुसार मंगळवारी दुपारी त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली. कुशावर्तावर पालखीचे पूजन झाल्यानंतर लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी पाहता मंदिर परिसराकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी लावण्यात आला. शिव मंदिरात पूजा करण्याची संधी मिळाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सकाळपासूनच भाविकांनी शिवमंदिरात गर्दी करत पूजा, अभिषेकासाठी रांगा लावल्या. भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.