शिवराय-एकनाथ शिंदेंच्या तुलनेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले “इमान विकलेल्या…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला गेला. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपाचे आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बेताल व्यक्तव्यं करून नयेत, असा सल्ला विरोधकांकडून दिला जातोय. याच प्रकरणावर माजी मंत्री तथा उद्धव ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांशी तुलना करणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, हा तर महाराष्ट्राचा द्वेष आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून शिंदे गटावर टीका केली आहे. ‘इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही. हा महाराष्ट्र द्वेष आहे! ‘महाराष्ट्राचं खच्चीकरण’ हेच या खोके सरकारचं ध्येय आहे!’ असे आदित्य ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी खडसावलं

मंलप्रभात लोढा यांनी शिंदे यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी ठेवलं होतं, त्याची आणि एकनाथ शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना कुणी बंदी केलं होतं? एकनाथ शिंदे हे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती,” असं अजित पवार म्हणाले.

हे वाचले का?  Sanjay Shirsat: भरत गोगावलेंचं मंत्रीपद संजय शिरसाटांमुळे हुकलं? ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण; शिंदे गटातली धुसफूस चव्हाट्यावर!

मंगलप्रभात लोढा काय म्हणाले होते?

“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून ( महाविकास आघाडी ) बाहेर पडले,” असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

हे वाचले का?  Manoj Jarange : “आरक्षण घेण्यासाठी आता एकच पर्याय”, मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “सत्तेत…”