शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले; कुडाळमध्ये शिवसेना आमदारासमोरच धक्काबुक्की

नगरपंचायतीमध्ये प्रवेश करत असणाऱ्या महिला सदस्यांनाही धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान होत असून या मतदानाला हिंसेचं गालबोट लागलं आहे. या ठिकाणी नगर पंचायत निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नगर पंचायतीच्या इमारतीच्या हद्दीतच वाद झाल्याचं पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गाडीने कुडाळ नगर पंचायतीच्या इमारतीच्या हद्दीत आणण्यात आल्याने भाजपा आणि शिवसेनेत बाचबाची झाली. नगराध्यक्ष निवडणुकीच्यावेळी शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला. शिवसेना-काँग्रेस विरुद्ध भाजप कार्यकर्ते अशी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना जोरदार धक्काबुक्की केली. यावेळेस नगरपंचायतीमध्ये प्रवेश करत असणाऱ्या महिला सदस्यांनाही धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं. पोलीस संरक्षणामध्ये या महिलांना इमारतीमध्ये नेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना बरेच प्रयत्न करावे लागले.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024 : देशाच्या पंतप्रधानांचं महाराष्ट्राला आवाहन; नरेंद्र मोदी सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “आज महाराष्ट्र…”!

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर लोटत प्रकरण वाढण्याआधीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

ही धक्काबुक्की आणि गोंधळ नक्की काय झाला यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र ही निवडणूक चुरशीची होणार असून यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागू राहिलेलं आहे. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर शिवसेना आणि काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न राबवून भाजपाकडून सत्ता ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.

हे वाचले का?  थोरात-विखे तिसऱ्या पिढीतील संघर्षाची झाली नांदी..; डॉ सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात आमने सामने