शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी केली मोठी मागणी, म्हणाले ‘… तर आम्ही घरी बसू’

एकनाथ शिंदे तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लगली आहे.

एकनाथ शिंदे तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लगली असून ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशील लढाई सुरु आहे. असे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे सांगितले. तसेच मागील काही दिवसांत जे काही घडलं, ते जनतेला मान्य नाही; त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका घ्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

“मला सर्वसामान्य जनतेला धन्यवाद द्यायचे आहेत. ज्यांची ओळख नाही असे अनेक लोक मसेज पाठवत आहेत. हळहळ व्यक्त करत आहेत. जे काही घडलं ते या लोकांना मान्य नाही. त्यामुळे हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच, “भारतीय पक्षाने जेव्हा घात केला, तेव्हाच आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे, ते जर अडीच वर्षांपूर्वी केलं असते; तर सगळं सन्मानाने झालं असतं. दोन हजार कोटी, तीन कोटी खर्चाचे आकडे येत आहेत. मात्र अडीच वर्षापूर्वी हे सन्मानाने झालं असतं. जे सन्मानाने झालं असतं ते घातपाताने का केलं? जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती, ती एवढा खर्च करुन का केली?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

हे वाचले का?  LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

“मला असं वाटतं, की विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. जर आम्ही चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य आहे. आम्ही घरी बसू. ते जर चुकले असतील, तर जनता त्यांच्याबद्दल जो निर्णय घेईल तोदेखील आम्हाला मान्य आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.