“शिवसैनिक फक्त आदेशाची वाट पाहातायत, ते भडकले तर…”, एकनाथ शिंदेंच्या बंडावर संजय राऊतांचा इशारा!

संजय राऊत म्हणतात, “हा पक्ष इतक्या सहज कुणी हायजॅक करू शकत नाही. विचारही करू शकत नाही. आमच्या रक्ताने हा पक्ष तयार झाला आहे. पण सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही तर पक्षविस्ताराची संधी मानतो”.

ज्येष्ठ शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्य सरकार कोसळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना उद्धव ठाकरेंनी हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात कमालीचा संभ्रम निर्माण झालेला असताना दुसरीकडे बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक होऊ लागले आहेत. पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असताना दुसरीकडे संजय राऊतांनी शिवसैनिक आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

“शिवसेना कुणी इतक्या सहज हायजॅक करू शकत नाही”

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांचं बंड, विरोधकांची भूमिका आणि शिवसेनेची आगामी वाटचाल या सर्व मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शिवसेना कुणीही इतक्या सहज हायजॅक करू शकत नाही, असं सुनावलं. “या पक्षाला उभं करण्यात आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, सगळे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली आहे. हा पक्ष इतक्या सहज कुणी हायजॅक करू शकत नाही. विचारही करू शकत नाही. आमच्या रक्ताने हा पक्ष तयार झाला आहे. शेकडो लोकांनी या पक्षासाठी बलिदान दिलं आहे. फक्त पैशाच्या जौरावर कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत यावर चर्चा होईल. सध्याच्या संकटाला आम्ही संकट मानत नाही तर पक्षविस्ताराची संधी मानतो”, असं राऊत म्हणाले होते.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

“ते भडकले तर आग लागेल”

“महाशक्ती म्हणवणारा राष्ट्रीय पक्ष कुणाच्या पाठिशी आहे म्हणून कुणाला हा पक्ष हायजॅक करता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेही म्हणायचे की हजारो शिवसैनिक माझ्या पाठिशी आहेत म्हणून मी शिवसैनिक आहे. आज हे हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहेत. सांगलीतले शिवसैनिक इथे आले आहेत. फक्त आदेशाची वाट पाहात आहेत. ते भडकले तर आग लागेल”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.