शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंवर संजय राऊत संतापले, म्हणाले…

“केंद्रानं सर्जिकल स्ट्राईक करावा”

केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून पुरावे देण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर केंद्रानं सर्जिकल स्ट्राईक करावा असं आवाहनही केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.

“जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!

“संपूर्ण देश चिंतेत आहे की लाखो शेतकरी सिंघू बॉर्डरवर लढत आहेत. सरकारला खरंच तोडगा काढायचा असता तर तोडगा निघाला असता. पण बहुधा सरकारला हा विषय असाच लोंबकळत ठेवायचा आहे. महाराष्ट्र, पंजाब तसंच इतर सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सारख्याच आहेत. सरकारला कायदा आणि शेतीच्या कायद्यात काही बदल हवे असतील तर भाजपशासित राज्यांमधून सुरुवात करावी. तिकडे प्रयोग करावा, काय परिमाण होतोय ते पाहता येईल आणि त्यानंतर इतर राज्यं स्वीकारतील. कदाचित पंजाबही स्वीकारेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

“एपीएमसीच्या बाबतीत बिहारमध्ये सुधारणा केल्या होत्या. आज बिहारमधील धान्याचा ९०० आणि पंजाबमध्ये १५०० अशी माझी माहिती आहे. आता बिहारच्या शेतकऱ्याने पंजाबला जायचं का ? त्यामुळे कृषी कायद्यातील बदल भाजपशासित राज्यात तात्काळ लागू करावेत. त्यानंतर अभ्यास केला जाईल आणि इतर राज्यं स्वीकार करतील,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

रावसाहेब दानवेंनी काय म्हटलं आहे –
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

“त्यांना वाटलं हे यशस्वी होणार नाही. यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत.