शेतकऱ्यांना अधिक मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार

नुकसानग्रस्त पिकांची छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नुकसानग्रस्त पिकांची छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

नाशिक : मागील दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असून शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे राज्य शासनामार्फत प्रस्ताव पाठविला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भातपिकाच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावेळी भुजबळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, जेणेकरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊन लवकरच मदत जाहीर केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून साधारणत: २० हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला येणारे २५ हजार कोटी रुपये अद्याप आलेले नाहीत. करोनामुळे प्रचंड खर्च सुरू आहे. सध्या पावसामुळे जी परिस्थिती उद्भवली, त्यात केंद्र सरकारने हातभार लावणे आवश्यक आहे. जेव्हा देशात कुठे असे मोठे नुकसान होते, तेव्हा राज्यावर सर्व सोडून चालत नाही. केंद्र सरकारदेखील मदत करीत असते, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करण्यास प्रयत्नशील आहे. कोणत्या पिकांचे, किती हेक्टरमध्ये नुकसान झाले आहे, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्रीदेखील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात संबंधित कंपन्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे भुजबळ यांनी नमूद के ले. या वेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी एस. पी. सूर्यवंशी, तहसीलदार परमेश्वर काळुसे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.