देणगी, शुल्क संकलनासाठी बँक खात्यांत बदल
अनिकेत साठे
येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात देणग्या आणि विविध प्रयोजनार्थ स्वीकारले जाणारे शुल्क, याकरिता बँक खाते उघडताना निमंत्रक संस्थेने आधी साहित्य महामंडळाची सूचना अव्हेरली आणि महामंडळाच्या फर्मानानंतर अपेक्षित नावाने खाते उघडण्याची कसरत केली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तसेच इतर अडचणींमुळे संमेलनाच्या सोहळ्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना हा बँक खातीनामांतराचा खेळ चकित करणारा आहे.
२६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या साहित्य संमेलनात निमंत्रक लोकहितवादी मंडळ आणि मराठी साहित्य महामंडळ यांच्यात बँक खात्याच्या बदलांवरून वादाची ठिणगी पडली.
मुळात निमंत्रक संस्थेला संमेलन देताना कशा पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे, याची माहिती महामंडळ देत असते. लोकहितवादी मंडळास ती पत्राद्वारे देण्यात आली होती. त्यामध्ये संमेलनाशी निगडित आर्थिक व्यवहारासाठी ‘९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक’ या नावाने एक बँक खाते उघडण्याचा उल्लेख होता. या खात्याचे व्यवहार कोणाच्या स्वाक्षरीने होतील, हे देखील नमूद करण्यात आले. निमंत्रक संस्थेने मात्र ‘९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, लोकहितवादी मंडळ नाशिक’ असे बदल करीत बँकेत खाते उघडले. त्यावर महामंडळाने आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. एक खाते पुरेसे असताना निमंत्रक संस्थेने वेगवेगळ्या बँकेत दोन खाती उघडल्याचे महामंडळाला आश्चर्य वाटले. बँक खात्यातील नावात दुरुस्ती करा अन्यथा ती दोन्ही खाती बंद करून त्यातील रक्कम नवीन खाते उघडून त्यात जमा करण्यास सांगण्यात आले. यावर निमंत्रकांनी ‘पॅनकार्ड’ नसल्याने तसे खाते उघडता आले नसल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला. त्यावर महामंडळाने योग्य नावाने खाते उघडण्यासाठी साहित्य महामंडळाचे ‘पॅनकार्ड’ निमंत्रकांच्या हवाली केले.
मध्यंतरी महामंडळाने हा विषय स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्यासमोरही नेला होता. बँक खाते प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती के ली. त्यानंतर लोकहितवादी मंडळाने ‘९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक’ अशी दुरुस्ती करत बँक खात्याची प्रत महामंडळाला सादर केल्याचे समजते.
वादाचे मूळ कशात?
सुरुवातीला लोकहितवादी मंडळाने संमेलनाचे साधारणत: एक कोटी १७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक राहील असे महामंडळास सांगितले होते. गरज पडल्यास आणखी २५ लाख जमा करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, नंतर अंदाजपत्रक फुगले. सध्या ते चार ते पाच कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. हा खर्च दाखवत लोकहितवादी मंडळ निधी संकलन करीत आहे. राज्य शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जवळपास सव्वा दोन कोटींचा निधी प्राप्त होईल. उर्वरित रक्कम ग्रंथ प्रदर्शन, स्वागत समिती सदस्य, राज्यासह देशभरातून नोंदणी करून सहभागी होणारे प्रतिनिधी, स्मरणिका जाहिरात आदींतून उभारण्याचा प्रयत्न आहे. संमेलनाचे अंदाजपत्रक गगनाला भिडल्याने महामंडळ चकित झाले आहे. महामंडळाने ठोस भूमिका घेऊन निमंत्रकांना एक पाऊल मागे घ्यायला लावल्याचे दिसते. निधी संकलनासाठी निमंत्रक संस्था जे माहितीपत्रक वितरित करते, त्यात ‘९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकहितवादी मंडळ, नाशिक’ या नाशिक र्मचट्स बँक आणि विश्वास बँकेतील खात्यांचा उल्लेख आहे. त्यांच्या नावात दुरुस्ती करून हे खाते क्रमांक कायम ठेवण्यात आल्याचे दिसून येते.
संमेलनासाठी ‘९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक’ या नावाने दोन बँकेत खाती आहेत. माहितीपत्रकात ‘९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकहितवादी मंडळ, नाशिक’ या खात्याचा उल्लेख चुकून झाला असावा. त्या बँक खात्यांचा क्रमांक आणि संमेलनासाठी उघडलेल्या खात्याचा क्रमांक एकच आहे. याच खात्यात निधी जमा होत आहे. संमेलनासाठी तो खर्च करायचा आहे. लोकहितवादी मंडळाचे खाते वेगळे आहे. बँक खात्याच्या नावावरून साहित्य महामंडळाने आक्षेप घेतलेला नाही. आम्ही कोणतेही खाते बंद केले नाही अथवा नवीन खाते उघडलेले नाही. आधी जे खाते क्रमांक होते, तेच आजही कायम आहेत. या संदर्भात महामंडळाने पत्रव्यवहार केलेला नाही.
– जयप्रकाश जातेगावकर, निमंत्रक, मराठी साहित्य संमेलन
झाले काय?
संमेलनासाठी देणगी, शुल्क भरता यावे यासाठी ज्या नावाने बँक खाते उघडणे अभिप्रेत होते, त्यात निमंत्रक संस्थेने स्वत:चे नाव समाविष्ट केले. याची गंभीर दखल घेत महामंडळाने नावात फेरबदल करून उघडलेल्या दोन्ही बँक खात्याच्या नावात दुरुस्ती करावी अथवा ती तत्काळ बंद करून प्रारंभी दिलेल्या नावाने खाते उघडण्याचे फर्मान काढले. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या संयोजकांनी अखेर तो निर्णय मान्य करून खात्याच्या नावात बदल केला.