संयोगीताराजेंच्या इंस्टाग्राम पोस्टनंतर आता काळाराम मंदिरातील महंत म्हणतात, “छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास…”संयोगीताराजेंच्या इंस्टाग्राम पोस्टनंतर आता काळाराम मंदिरातील महंत म्हणतात, “छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास…”

महंत सुधीरदास यांनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याची शक्यता व्यक्त करीत या प्रकरणात छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: पंचवटीतील प्रसिध्द श्री काळाराम मंदिरात कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिताराजे यांचा पूजा विधीवरून महंत सुधीरदास पुजारी यांच्याशी वाद झाल्याचे समाज माध्यमातून उघड झाले आहे. यासंदर्भात महंत सुधीरदास यांनी हा प्रकार गैरसमजातून झाल्याची शक्यता व्यक्त करीत या प्रकरणात छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे. लवकरच कोल्हापूर येथे थोरले शाहू महाराज यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्यासमोर निवेदन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात राज्यासह देश-विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असतात. याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला आहे. मंदिरात दीड महिन्यांपूर्वी संयोगिताराजे या पूजाविधीसाठी आल्या होत्या. त्यावेळी मंदिरात पूजेवरुन झालेल्या वादाविषयी त्यांनी समाज माध्यमाव्दारे माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. तथाकथित महंतांनी पूजेसाठी पुराणातील (पुराणोक्त) मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे आपण त्यास ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन आपणास वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगणाऱ्या महंतांनी महामृत्यूंजय मंत्राचा जप केल्यावरही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे शंभर वर्षानंतरही मानसिकता का बदलली नाही, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याकडे संयोगिताराजे यांनी लक्ष वेधले. राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांंना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे. परमेश्वराच्या लेकरांना, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्तीची गरज नाही, असे त्यांनी महंतांना सुनावले. त्यानंतर आपण रामरक्षाही म्हटली. ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात, ती मंदिरे छत्रपतींनी वाचविली. मग छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करू नका. असे सांगूनही महंतांनी महामृत्यूंजय मंत्र जप केल्यावरून प्रतिप्रश्न केल्याचे संयोगिताराजे यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

पूजाविधीवेळी उद्भवलेल्या वादावर मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी शुक्रवारी आपली बाजू मांडली. संयोगिताराजे यांनी अभिषेक संकल्प करण्यास सांगितले होते. तो वेदोक्त असायला हवा, असेही त्यांनी सांगितले होते. यावर प्रभुरामचंद्रांना वेदोक्तच पूजा अभिषेक केला जातो, असे स्पष्ट केले होते. संकल्प सांगताना श्रुती, स्मृती, पुराणोक्त असे म्हटल्यावर राणी साहेबांनी पुराणोक्त शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला. संकल्प करताना त्यात वेदोक्त आणि पुराणोक्त असे काही नसते, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. छत्रपती घराण्याबाबत काळाराम मंदिरातील पुजारी घराण्याला नितांत आदर आहे. वेदोक्त पूजेचा अधिकार नसल्याचे आपण बोललो नाही. छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असे महंत सुधीरदास यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गुप्त भुयार? पुरातत्त्व खात्याकडून होणार पडताळणी..

छत्रपती घराणे आणि मंदिराचे पुजारी घराणे यांचे कित्येक पिढ्यांचे संबंध आहेत. वेदोक्त पूजा छत्रपती घराण्याचा अधिकार आहे. उपरोक्त प्रकार गैरसमजातून झाला असावा. कोल्हापूर येथे मोठ्या महाराजांची भेट घेऊन लवकरच गैरसमज दूर केले जातील. संयोगिताराजे या पावणेदोन महिन्यांपूर्वी पूजाविधी करण्यासाठी मंदिरात आल्या होत्या. त्यांनी प्रसाद स्वीकारून दक्षिणाही दिली होती, असे महंत सुधीरदास यांनी नमूद केले आहे.

हे वाचले का?  नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत