‘समूह प्रतिकारशक्ती’पासून देश अद्याप दूरच!

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) आत्तापर्यंत तीन सिरो सर्वेक्षणे केली आहेत.

करोना कृतिगटाचे प्रमुख पॉल यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटना आणि एम्स (दिल्ली) यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणी केलेल्या सिरो सर्वेक्षणात, ग्रामीण भागात ६२.३ टक्के लोकसंख्येला करोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरांपेक्षा ग्रामीण भागात ‘समूह प्रतिकारशक्ती’ निर्माण होण्याची शक्यता अधिक असली तरी, नेमके देशव्यापी अनुमान काढता येणार नाही. वेगाने लसीकरण हाच करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचा पर्याय असल्याचे करोना कृतिगटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर लोकांमध्ये निर्माण झालेली प्रतिपिंडे यासाठी करण्यात येणाऱ्या सिरो सर्वेक्षणात उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ग्रामीण भागात संसर्ग होऊन गेल्याचे प्रमाण ८७.९ टक्के तर, दिल्लीतील शहरी भागात ते ७४.७ टक्के असल्याचे आढळले.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) आत्तापर्यंत तीन सिरो सर्वेक्षणे केली आहेत. जानेवारी २०२१ मध्ये ७० ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात २१.६ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती. या महिन्यात चौथे सर्वेक्षण सुरू होणार असून त्यातील निरीक्षणावरून देशातील किती लोकसंख्येला करोनाचा संसर्ग झाला होता हे समजू शकेल, असे पॉल यांनी सांगितले. काही भागांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याने ते ‘समूह प्रतिकारशक्ती’ निर्मितीच्या स्थितीत असले तरी, संपूर्ण देशभरात अजून तरी तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘एम्स’च्या सर्वेक्षणानुसार, १८ वर्षांपेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त वयोगटांतील व्यक्तींना करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता सारखीच असल्याचे दिसते. या दोन्ही गटांत अनुक्रमे ५९ टक्के आणि ६७ टक्के व्यक्तींमध्ये प्रतिपिंडे आढळली. या वयोगटांत शहरी भागांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ७८ टक्के आणि ७९ टक्के होते तर, ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ५६ टक्के आणि ६३ टक्के होते. हे पाहता लहान मुलांमध्ये वा तरुणांमध्ये तसेच अन्य वयोगटांतील नागरिकांमध्येही करोनाबाधित होण्याच्या संभाव्य प्रमाणात फारसा फरक नाही, असे पॉल यांनी  सर्वेक्षणाचा संदर्भ देत नमूद केले.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

लसीकरणामुळे संसर्ग तीव्रता कमी

लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता ७५-८० टक्क्यांनी कमी होते. तसेच फक्त ८ टक्के बाधितांना प्राणवायूची गरज लागू शकते. अतिदक्षता विभागात उपचार घेण्याची शक्यताही केवळ ६ टक्के असते. त्यामुळे करोनाची संभाव्य लाट टाळण्यासाठी लसीकरणावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे पॉल यांनी स्पष्ट केले.

मुलांना अधिक संसर्गाची शक्यता नाही…

हे वाचले का?  भारत-चीन सीमावाद : देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण; भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार

सिरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता नसल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी स्पष्ट केले. कृतिगटाचे प्रमुख पॉल यांनीही त्यास दुजोरा दिला.