सांगितलं होतं पवारांचा नाद करू नका, पण सुधारणार नाहीत; धनंजय मुंडेंनी भाजपाला दिलीआठवण

फडणवीस, पाटील यांनी भाजपाचं वाटोळ केलं

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू असून, राजकीय टोलेबाजी जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी जुन्या इशाऱ्यांची आठवण भाजपावर निशाणा साधला आहे. “भाजपाने मधल्या काळात फोडाफोडी केली होती. त्यावेळी भाजपाला सांगितलं होतं की पवारसाहेबांचा नाद करु नका. पण सुधारणार नाहीत. पवारसाहेब की लाठी ऐसी बैठी है, बहुत दिनों के बाद पता चला है की कैसी बैठी है,” असं म्हणत मुंडेंनी भाजपाच्या जखमेवर बोट ठेवलं.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची अंबाजोगाईमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी मुंडे यांनी भाजपावर शरसंधान साधलं. “सत्ता स्थापन झाल्यानंतर मला एकाने विचारलं लोकशाही काय आहे? मी म्हणालो, या देशाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर लोकशाही दाखवली आहे. ६४ आमदारांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, ५४ आमदार असलेल्या पक्षाचा उपमुख्यमंत्री होतो, ४४ आमदारांच्या पक्षाचे मंत्री बनतात आणि १०५ आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो, त्याला लोकशाही म्हणतात. लोकशाही काय असते, हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला गर्व आहे,” अशी टीका मुंडे यांनी केली. “कोरोनापासून आपण आणि आपल्या कुटुंबाला वाचवतोय तसंच भाजपाच्या संसर्गापासून सुद्धा तुम्हाला यापुढे आपल्या कुटुंबाला दूर ठेवावे लागेल,” असंही मुंडे म्हणाले.

हे वाचले का?  Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आमदार अमोल मिटकरी यांनीही या सभेत भाजपाला लक्ष्य केलं. “भाजपावाले रोज मंदिरात जातात. सर्वात जास्त पापी इतर तुमच्याच पक्षात आहेत. लोकांच्या मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करावे का? मंदिरांचा ठेका फक्त भाजपावाल्यांनीच घेतलाय का? चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार या लोकांनी भाजपाचं वाटोळं केलं,” असं टीकास्त्र मिटकरी यांनी डागलं.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…