साताऱ्यामध्ये ‘लाडक्या बहिणीं’ची घरी जाऊन नोंदणी; पथकाच्या माध्यमातून पाहणी, जागेवरच दाखले

हे पथक घरी जाऊन ‘मोबाइल अॅप’च्या मदतीने नोंदणी करणार आहेत. आवश्यकतेप्रमाणे तलाठी जागेवरच येणार आहेत.

सातारा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी लाभार्थी महिलांची घरोघरी जातनोंदणी केली जाणार असून, यासाठी आवश्यक दाखलेही जागेवरच दिले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी तलाठी चावडी, महा-ई-सेवा केंद्रात होणारी गर्दी, आर्थिक भुर्दंड टाळण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत नावनोंदणी करण्यासाठी सध्या महिलांची तलाठी चावडी, नागरी सुविधा केंद्र, सेतूमध्ये तुडुंब गर्दी होत आहे, भर पावसात घराघरांतील कामे सोडून समाळी सकाळीच महिलांच्या मोठ्या रांगा सरकारी कार्यालयांबाहेर लागत आहेत.

हे वाचले का?  निवडणुकीसाठी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

गर्दीमुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही होत आहेत. दुसरीकडे या योजनेचा फायदा घेण्यासाठी होत असलेली गर्दी पाहून अनेक दलालांनी यामध्ये शिरकाव केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रोजचे काम सोडून, गर्दीत ताटकळत बसणे, पायपीट करणे टाळण्यासाठी, तसेच वेळ आणि श्रमाची बचत करण्यासाठी वरील निर्णय घेण्यात आल्याचे डुडी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नगरमधील झुंडबळीप्रकरणी सरपंचासह ७ जणांना अटक; शेळ्या चोरीच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला

घरी जाऊन नोंद करण्यासाठी प्रत्येक पन्नास कुटुंबांमागे एक पथक तयार करण्यात आले आहे. त्या पथकात ग्रामसेवक, तलाठी, बचत गटातील महिला पदाधिकारी, आशासेविका, आशा मदतनीस यांचा समावेश आहे.

हे वाचले का?  Aparajita Woman and Child Bill : बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी; पश्चिम बंगाल सरकारचं नवं विधेयक

हे पथक घरी जाऊन ‘मोबाइल अॅप’च्या मदतीने नोंदणी करणार आहेत. आवश्यकतेप्रमाणे तलाठी जागेवरच येणार आहेत. योजनेसाठी ३१ ऑगस्टची मुदत असल्यामुळे महिलांनी कोणतीही घाई गडबड करू नये, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

महिलांची पायपीट टाळण्यासाठी आमचे पथक घरोघरी जाऊन ‘लाडक्या बहिणी’ची नोंद करणार आहे. ‘मोबाइल अॅप’वर नोंदणी करून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती जोडतील. केशरी आणि पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्रधारकांना कोणत्याही उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड असेल, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तलाठी जागेवर पूर्ण करणार आहेत. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा</p>