साधा रिक्षाचालक ते हेलिकॅाप्टर मालक… सीबीआयने अटक केलेले पुण्यातील अविनाश भोसले आहेत तरी कोण?

एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला हा अविनाश भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने( सीबीआय) गुरुवारी अटक केली. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली.  गैरव्यवहारातील रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण २०१८ मधील असून, त्यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत हजारो कोटी रुपये इतरत्र व्यवहारात आणण्यात आले. त्यासाठी विविध बँक खात्यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही रक्कम अविनाश भोसले यांनी इतरत्र वळवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सीबीआयने १ मे रोजी पुणे आणि मुंबईत शोध मोहीमही राबवली होती.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधण्याचे आणि ती वाढविण्याचे कैशल्य असलेले अविनाश भोसले यांची कारकीर्द आश्चर्यकारक अशीच आहे. एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा अलिशान बंगला हा अविनाश भोसले यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

बांधकाम व्यवासायाबरोबरच राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही कायम चर्चेत राहिलेले अविनाश भोसले अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातून नोकरीच्या शोधात पुण्यात आले. पुण्यात नोकरी न मिळाल्याने रिक्षा चालविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रास्ता पेठ परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले आणि रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. रिक्षा व्यवसायात थोडा जम बसल्यानंतर रिक्षा भाड्याने चालविण्यास देण्यास अविनाश भोसले यांनी सुरवात केली. त्यातून बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे संबंध आले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारी करणाऱ्या काही व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतर रस्ते करण्याची लहान-मोठी कंत्राटे त्यांना मिळाली. पुढे नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांनी जास्त मोठी कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. मात्र सेना-भाजप युतीच्या सत्ताकाळातच त्यांची खरी भरभराट झाली.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

युती सरकाराने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग ओलिताखाली आणणे हा महामंडळ स्थापनेचा उद्देश होता. महामंडळाच्या माध्यमातून अविनाश भोसले यांनी शेकडो कोटींची कंत्राटे घेतली. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधण्याचे कैशल्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट वेगाने झाली. युती सरकारने नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात आले. नव्या सत्ताधाऱ्यांशीही त्यांनी जुळवून घेतले.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही राज्यातील सिंचन प्रकल्प रखडले असतानाच भोसले यांची संपत्ती मात्र दिवसेंदिवस वाढत होती. बाणेर येथील त्यांचा अलिशान व्हॅाईट हाऊस हा बंगला आणि तीन हेलीकाप्टर हा चर्चेचा विषय ठरला. हॅालिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री ॲंजेलिना जोली हिचे त्या बंगल्यातील वास्तव्य चर्चेचा विषय झाले होते. शहरात येणारे अनेक बडे राजकीय नेते त्यांचे हेलिकॅाप्टर आणि हेलिपॅडचा वापर करतात, ही गोष्टही लपून राहिली नाही.

हे वाचले का?  Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत