सायबर गुन्हेगारीत वाढ, सहा महिन्यात १५ कोटीहून अधिक रक्कम लंपास

शहर परिसरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना समाजमाध्यमातूनही गुन्हेगारांनी वेगवेगळ्या कल्पना वापरत नागरिकांची आर्थिक लूट करण्यास सुरूवात केली आहे.

नाशिक: शहर परिसरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असताना समाजमाध्यमातूनही गुन्हेगारांनी वेगवेगळ्या कल्पना वापरत नागरिकांची आर्थिक लूट करण्यास सुरूवात केली आहे. केवळ सहा महिन्यात समाजमाध्यमांचा वापर करत बनावट क्रमांकावरून ५१ नागरिकांना १५ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याच्या तक्रारी सायबर पोलीस ठाण्यात नाेंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम केवळ पाच लाखांहून अधिक रक्कम असलेल्या गुन्ह्यांची आहे. पाच लाखांच्या आतील फसवणुकीच्या रकमेचा यामध्ये समावेश नाही.

मालमत्ता वाद, टोळीयुध्द, जिविताला धोका, यासंदर्भात पोलीस वेगवेगळ्या माध्यमांतून लक्ष्य ठेवून असतात. परंतु, समाजमाध्यमातून होणारी पांढरपेशी गुन्हेगारी वेगळ्या पध्दतीने हाताळण्या येते. ही गुन्हेगारी थांबविणे नागरिकांच्या सतर्कतेवर अवलंबून आहे. सद्यस्थितीत समाजमाध्यम, ई व्यवहार यांचा सर्रास होणारा वापर, यामुळे नागरिकांची माहिती वेगवेगळ्या ठिकाणी संकलित होत असून ती काळ्या बाजारात विकली जात आहे. या माहितीचा पांढरपेशा गुन्हेगारांकडून हत्यार म्हणून वापर होत असून नोकरदार, बेरोजगार, महिला, सेवानिवृत्त, विशेष म्हणजे सुशिक्षित वर्ग यांना सावज करुन त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. यासाठी सायबर भामट्यांकडून वेगवेगळ्या कल्पनांचा वापर केला जात आहे.

पहिल्या प्रकारात बनावट क्रमांकावरून समोरच्या व्यक्तीशी संपर्क करत एआय तंत्राचा वापर करत ओळखीच्या व्यक्तीच्या नावे दूरध्वनी केला जातो. यामध्ये मी दवाखान्यात आहे…माझा अपघात झाला…दवाखान्याचे पैसे द्यायचे आहेत, असे सांगत समोरच्याला सातत्याने दूरध्वनी करत पैसे पाठविण्यासाठी दबाव आणला जातो. काही वेळा त्याच्या भ्रमणध्वनीत पैसे पाठविण्याचा संदेशही टाकला जातो. रक्कम खात्यात जमा झाली की नाही याची खातरजमा न करू देता समोरच्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे संपूर्णत: हस्तांतरीत करण्यासाठी दबाव टाकला जातो. खात्यातील रक्कम गेल्यानंतर समोरच्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. हाऊस अरेस्ट प्रकारात समोरच्या व्यक्तीशी संपर्क करत पोलीस, सैन्य, नौदल, तपास यंत्रणेतील कोणी महत्वाचा व्यक्ती बोलत असल्याचे भासवत तुमच्या कुरियरमध्ये अमली पदार्थ सापडले…तुम्ही पॉर्न लिंक वापर करताना सापडले…तुमचे सीमकार्ड दहशतवादी संघटनेच्या टोळक्याकडे आढळले…केवायसी अपडेट करायचे आहे, अशी वेगवेगळी कारणे देत समोरच्याला कायद्याची भीती दाखवली जाते. त्याच्याशी संपर्क झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी बोलत असल्याचे सांगून त्यांचा फोन आभासी दृकश्राव्य करण्यास सांगितले जाते. यासाठी स्काइपचा वापर केला जातो. यावेळी एखादी लिंक पाठवली जाते. समोरच्याचा जबाब नोंदवत असताना एवढी दंडाची रक्कम, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जातो, असे सांगत त्याचे खच्चीकरण होते. या दबावाला बळी पडून समोरचा व्यक्ती गुन्हेगारासमोर आपले आर्थिक व्यवहार खुले करत सर्व तपशील पुरवितो. यामुळे खात्यातील सर्व रक्कम, अन्य बचतही गेल्याचे प्रकार झाले आहेत.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

तिसऱ्या प्रकारात एनी डेस्क ॲपमध्ये समोरच्या व्यक्तीला लिंक पाठवत त्याला त्यावर कळ दाबण्यास सांगण्यात येते. या माध्यमातून त्याची स्क्रीन शेअर होत सर्व माहिती समोर येते. सध्या या माध्यमातून महानगर गॅस लिमिटेड किंवा विद्युत महामंडळाच्या वतीने संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याशिवाय क्रेडिट, डेबिट कार्ड घोटाळा, रोजगार घोटाळा, टेलिग्राम, इन्स्टाग्राम किंवा अन्य समाजमाध्यमातून जाहिरात पाठवून समोरच्याला काम दिले जाते. एखादे पेज लाईक, रिव्हयू करण्यास सांगत त्याला सुरूवातीचे दोन ते तीन दिवस दीड ते दोन हजार रक्कम खात्यात जमा केले जातात. यापेक्षा जास्त कमवायचे तर वेगळे ॲप टाकून काही रक्कम गुंतविण्यास सांगितले जाते. या माध्यमातून नागरिकांची फसवणुक होते. सर्वाधिक फसवणूक गुंतवणूक किंवा शेअर व्यवहाराच्या माध्यमातून होत आहे. वेगवेगळ्या शेअर्समध्ये रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखवित आयपीओ, इंट्रा ट्रेडिंगच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक होत असल्याचा आभास निर्माण करत समोरच्याकडून पैसे उकळले जातात. चालु वर्षात २२ प्रकरणे या संदर्भात दाखल आहेत.

हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?

आभासी पध्दतीने फसवणूक झाल्यास…

नागरिकांनी आपली आभासी पध्दतीने फसवणूक झाल्यास शक्य तितक्या लवकर १९३० किंवा सायबरक्राइम डाॅट इन या लिंकवर जाऊन आपली तक्रार नोंदवावी. यामुळे आर्थिक व्यवहार थांबविण्यात पोलिसांना मदत होते. खात्यातील रक्कम कोणकोणत्या बँक खात्यांमध्ये फिरत आहे, यावरून व्यवहार, कोणाचा सहभाग हे स्पष्ट होते.

सतर्कता बाळगावी

समाजमाध्यम, स्मार्टफोनच्या माध्यमातून गुन्हेगार आपले सावज शोधत राहतात. या माध्यमातून माहिती संकलित करुन समोरच्या व्यक्तीच्या खात्यात किती रक्कम आहे, यानुसार त्याला बनावट फोन, होम ॲरेस्ट, जॉब फ्रॉड किंवा अन्य प्रकारात अडकवले जाते. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर जाऊ नये, आपले बँक तपशील कोणालाही सांगु नयेत, पोलीस कधीही पैशाची मागणी करीत नाहीत. जवळच्या व्यक्तीच्या आवाजात अन्य क्रमांकावरून कोणी संपर्क केल्यास त्या व्यक्तीशी संपर्क करुन खातरजमा करावी. नागरिकांनी सतर्क राहत व्यवहार करावेत.रियाज शेख (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे)

एआयचा सर्रास वापर

सायबर भामट्यांकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रीम बुध्दीमत्ता तंत्राचा वापर एखाद्या व्यक्तीचा आवाज, चेहरा डब करण्यासाठी होत आहे. या तंत्राचा वापर करत संपर्क केल्यास ग्राहकांचा विश्वास बसणे, समोरच्याशी भावनिक जवळीक साधण्यास मदत होत आहे.