हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव – पूज्य साने गुरुजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा. डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती जाणून घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगत संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासनही दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खान्देशसाठीच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनात घेण्यात येणार्या विषयांवरील मंथनामुळे राज्याला दिशादेखील मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संपूर्ण खान्देशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमळनेर येथे दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात पूज्य साने गुरुजी साहित्यनगरी साकारली जात आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तयारीचा आढावा घेत आहेत. जिल्हा प्रशासनाकडूनही विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.