साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना प्रवेश

खुष्कीच्या मार्गाचा अवलंब; स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, उपाध्यक्ष दादा भुसे, नरहरी झिरवाळ

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून राजकीय मंडळींना दूर ठेवण्याचे सूतोवाच साहित्य महामंडळाने केले असले तरी स्वागत समितीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना संमेलनात मानाचे स्थान देण्याची धडपड निमंत्रक संस्थेने केल्याचे उघड झाले आहे.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निवड करण्यात आली. तसेच स्वागत समितीच्या उपाध्यक्षपदी कृषिमंत्री तथा शिवसेनानेते दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना स्थान देण्यात आले आहे.

शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्यानंतर सोमवारी सकाळी लोकहितवादी मंडळ आणि स्थानिक साहित्य संस्थांची बैठक पार पडली. स्वागत समिती, सल्लागार समिती गठित करून पदाधिकाऱ्यांची नांवे लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत टकले यांनी जाहीर केली.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

गेल्या वर्षीपासून साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून राजकीय नेत्यांना दूर ठेवण्याचे निश्चित झाले. नियोजित संमेलनाचे उद्घाटनदेखील लेखकाच्या हस्ते करण्याचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले आहे. स्वागत समिती, सल्लागार समितीत राजकीय नेत्यांना आधिक्याने स्थान देऊन महामंडळाच्या भूमिकेला छेद गेल्याची बाब टकले यांनी नाकारली. स्वागत समितीत कोणाला स्थान द्यायचे, याविषयी निमंत्रक संस्थेवर कोणतेही बंधन नव्हते. साहित्य किं वा नाटय़ संमेलनास शासनाची मदत मिळते हे सर्वज्ञात आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी आम्हाला शासनाकडे जावे लागणार आहे. व्यासपीठावर येणे, न येणे हा वेगळा भाग आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते, राज्यातील सर्व खासदार, आमदारांना नाशिकच्या संमेलनास सन्मानाने निमंत्रित केले जाणार आहे. साहित्य महामंडळाने घालून दिलेल्या चौकटीत ते कसे बसवायचे, याकडे लक्ष दिले जाईल, असे ते म्हणाले. स्वागत समितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आधिक्याने समावेश असल्याच्या प्रश्नावर टकले यांनी संबंधितांकडील महत्त्वाच्या वैधानिक जबाबदाऱ्या पाहून त्यांना स्थान देण्यात आल्याचे नमूद केले.

हे वाचले का?  Nair Hospital Molestation : “नायरची वाटचाल कोलकाताच्या दिशेने”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसेचा सरकारला सूचक इशारा!

स्वागत समितीत भुजबळ, भुसे आणि झिरवाळ या राजकीय मंडळींबरोबर उपाध्यक्षपदी गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले तर याच मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगांवकर कार्यवाहपदाची जबाबदारी सांभाळतील. संमेलनासाठी स्थापन होणाऱ्या विविध ३९ समित्यांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विश्वास ठाकूर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, या संदर्भात साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले म्हणाले ‘‘राजकीय नेत्यांबाबत साहित्य महामंडळाची भूमिका जाहीर आहे. आणीबाणीच्या काळात कराडमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात दुर्गाबाई भागवत संमेलनाध्यक्ष असताना त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीला हरकत घेतली होती. तेव्हा चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते त्यांच्या विनंतीचा मान राखून मांडवात समोरच्या खुर्चीत बसून संमेलनात सहभागी झाले होते.’’

हे वाचले का?  Student Suicides Report: विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; शेतकऱ्यांपेक्षाही अधिक संख्या, धक्कादायक अहवाल

संमेलनात राजकीय व्यक्तींचा अधिक्षेप होऊ दिला जाणार नाही आणि साहित्य महामंडळाची चौकटही मोडू दिली जाणार नाही. संमेलनात ज्यांना भूमिका असेल, त्यांना व्यासपीठावर येण्यास महामंडळाचा आक्षेप नाही. त्यामुळे कोणताही वाद होण्याची शक्यता नाही.

– हेमंत टकले, कार्याध्यक्ष, ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन