सुरक्षित वाहतुकीसाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम

शहरातील प्रमुख चौकात स्वयंसेवक वाहनधारकांना नियम पालनाचा आग्रह धरणार आहेत.

नाशिक : शहराची वाहतूक संस्कृती जपली जावी, वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाहतूक सुरक्षित करण्यात योगदान द्यावे, या उद्देशाने नाशिक फर्स्ट आणि लॉर्ड इंडिया यांच्यावतीने २१ ते ३१ जुलै या कालावधीत ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ गुरूवारी दुपारी १२ वाजता वाहतूक शिक्षण उद्यान (ट्रॅफिक एज्युकेशन पार्क) येथून होणार आहे.

शहरातील प्रमुख चौकात स्वयंसेवक वाहनधारकांना नियम पालनाचा आग्रह धरणार आहेत. या शिवाय, पेट्रोल पंप, रिक्षा, बस, चित्रपटगृहात जनजागृती करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास लॉर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुप देशमुख, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त रमेश पवार, प्रादेशिक परिवहनचे प्रदीप शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले आदी उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेची माहिती पत्रकार परिषदेत नाशिक फस्र्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, सुरेश पटेल, गौरव धारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी संस्था अनेक वर्षांपासून जनजागृतीचे काम करीत आहे.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री

त्या अंतर्गत वाहतूक नियमांच्या पालनाचा नव्याने आग्रह धरला जाणार आहे. या मोहिमेंतर्गत ५० पेट्रोल पंपांवर वाहतूक नियमांची माहिती देणारे फलक लावले जातील. दीड हजार ऑटोरिक्षा आणि सिटीलिंकच्या बसेसवर भित्तीपत्रके लावली जाणार आहेत. शहरातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रके लावून जनजागृती केली जाणार आहे. या शिवाय चित्रपटगृहात माहितीपटाद्वारे जनजागृती केली जाईल.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा वाहनांची फेरी काढली जाणार आहे. दरवर्षी रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हेल्मेट परिधान न केल्याने अनेक दुचाकी वाहनधारकांना प्राण गमवावे लागल्याची बाब पोलिसांकडून वारंवार मांडली जाते. रस्ता सुरक्षा नियमावलीविषयी नागरिकांना शिक्षित करून नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर मोहीम राबविली जाणार आहे.

हे वाचले का?  मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार

सिग्नलपासून ते चित्रपटगृहापर्यंत..
या मोहिमेंतर्गत वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर टाळा, मद्यपान करून वाहन चालवू नका, हेल्मेटचा नियमित वापर करा, परवाना नसल्यास वाहन चालवू नका, सीटबेल्टचा वापर करा, सिग्नल सुटण्याची प्रतीक्षा करा, झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टय़ावर वाहने थांबवू नका, ना वाहनतळ क्षेत्राचे नियम पाळा, एकेरी मार्गाचे नियम पाळा अशा अनेक नियमांची माहिती विविध माध्यमातून देण्यात येणार आहे. या मोहिमेत १० दिवस स्वयंसेवक प्रमुख सिग्नलवर उभे राहून वाहनधारकांना नियम पाळण्याची प्रत्यक्ष विनंती करतील. पेट्रोलपंप, रिक्षा, बसेस आदींवर फलक, भित्तीपत्रकाच्या सहाय्याने वाहतूक नियमावली मांडली जाईल. इलेक्ट्रिक वाहनांची शहरात फेरी काढण्यात येणार आहे. १०० उद्योगांनी आपल्या आवारात वाहतूक नियमावलीचे फलक लावण्यास संमती दिली आहे.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग