सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेनं उपमुख्यमंत्र्यांना खडसावलं

मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद

महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. ”सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,” अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ”सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.” याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास शिवसेनेने सामना अग्रलेखातून व्यक्त करत कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना खडसावलं आहे.

सवदी काय म्हणाले होते?
बेळगाव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकात राहणार, असे ठाम वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत केले.

अग्रलेखात काय म्हटलेय?
लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज ती काय? एखाद्या राज्याचा स्थापना दिवस हा पवित्र, मंगलमय दिवस असतो. त्या दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण गेल्या साठेक वर्षांत मराठी माणूस, भाषा, संस्कृतीवर जे निर्घृण हल्ले तेथे सुरू आहेत त्याचाच हा उद्रेक असतो. कर्नाटक व महाराष्ट्राचे व्यक्तिगत भांडण असण्याचे कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे; पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील 20 लाख मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे.

हे वाचले का?  Gautam Adani : “गौतम अदाणींनी मविआ सरकार पाडलं, अजित पवारांची कबुली”, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचा टोला

महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या 70 वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरूआहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

हे वाचले का?  Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत. सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे.

किमानपक्षी राज्यपालांनी बेळगावच्या शिष्टमंडळास पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे. सीमा भागातील जनतेला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ‘काळा दिवस’ पाळला व दंडास काळ्या फिती बांधून काम केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील भाजपसह इतर राजकीय पक्षही सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार दर्शन कानडी राज्यकर्त्यांना घडले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता.

सीमाप्रश्नी ६९ हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. सीमा भागात जेव्हा जेव्हा मराठी बांधवांवर कानडी सरकारचे हल्ले झाले, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. ”सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,” अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ”सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.” याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल!