‘स्मार्ट सिटी’च्या खोदकामांनी नाशिककर त्रस्त ; कंपनी कार्यालयास कुलूप लावण्याचा शिवसेनेचा इशारा

शहरात स्मार्ट सिटी योजनेत भुयारी गटार, जलवाहिनीच्या कामांसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते पावसाळय़ात पादचारी आणि वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे.

नाशिक: शहरात स्मार्ट सिटी योजनेत भुयारी गटार, जलवाहिनीच्या कामांसाठी ठिकठिकाणी खोदून ठेवलेले रस्ते पावसाळय़ात पादचारी आणि वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत असून ठेकेदार काम करीत नसल्याचे सांगितले जाते. रखडलेली ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

सलग काही दिवस सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यात स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांनी भर घातली. पंचवटीसह गोळे कॉलनी, घारपुरे घाट मध्यवर्ती भागात ही कामे सुरू आहेत. कुणाची मागणी नसताना सुरू केलेली कामे रखडलेली आहेत. या संदर्भात शिवसेनेचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी स्मार्ट सिटी कंपनीला निवेदन दिले आहे. ठेकेदार काम करीत नसल्याचे स्मार्ट सिटीकडून सांगितले जाते. त्यामुळे ते का काम करीत नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

हे वाचले का?  नाशिकात ATS ची कारवाई, दोन महिलांसह तीन बांगलादेशी अटकेत

पावसाळय़ात बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले आहे. अत्यंत रहदारीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेत कामे सुरू केली गेली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहनतळाच्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. खोदलेल्या रस्त्यांवर पाणी साचते. त्यामुळे अपघात घडू शकतात. अशी काही दुर्घटना घडली तर त्याला स्मार्ट सिटी मंडळ जबाबदार राहील, असे बोरस्ते यांनी सूचित केले.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य

स्मार्ट सिटीअंतर्गत खोदून ठेवलेले रस्ते, जलवाहिनी आणि गटारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा शिवसेना स्मार्ट सिटीच्या कारभाराविरोधात जनआंदोलन उभारेल. वेळेत ही कामे पूर्ण न झाल्यास शिवसेना स्मार्ट सिटी कार्यालयाला कुलूप लावेल, असा इशाराही देण्यात आला आहे.