हंगामी पदभरतीत मुक्त विद्यापीठाकडून उमेदवारांची लूट होत असल्याचा आरोप, राज्यपालांकडे तक्रार

भरतीत विद्यापीठाने अक्षरश: लूट चालविली असून ती थांबविण्याची मागणी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

नाशिक – आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून हंगामी, करारनामा पध्दतीच्या शैक्षणिक समन्वयक पदांसाठी भरती करण्यात येत असून खुल्या गटासाठी एक हजार तर, राखीव गटातील उमेदवारांसाठी ६०० रुपये अर्ज शुल्क आहे. निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीच्या आधारे होणार आहे. भरतीत लेखी परीक्षेचा कुठलाही भार नसताना अवास्तव शुल्क आकारल्याचा आक्षेप घेतला जात आहे. भरतीत विद्यापीठाने अक्षरश: लूट चालविली असून ती थांबविण्याची मागणी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपालांकडे करण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठाने विविध विद्याशाखा, विभागीय कार्यालये आणि अभ्यास केंद्रात नियुक्त करावयाच्या हंगामी ६३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सहायक प्राध्यापक पदाशी समकक्ष शैक्षणिक समन्वयक हे पद आहे. सहायक प्राध्यापक श्रेणीत सातव्या वेतन आयोगाच्या निकषाप्रमाणे निवडलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. विविध शिक्षणक्रमांच्या या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास नुकतीच सुरुवात झाली. जाहिरातीत प्रसिध्द झालेली पदांची संख्या कमी-अधिक करण्याचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवला आहे. ऑनलाईन अर्जासह शैक्षणिक कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ छाननी करून शैक्षणिक अर्हता, अनुभव आदी निकषांनुसार गुणवत्तावान उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. या प्रक्रियेत विद्यापीठाने निश्चित केलेले शुल्क उमेदवारांना त्रासदायक ठरत आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

शासकीय वा निमशासकीय आस्थापनेत कायमस्वरुपी, हंगामी स्वरुपातील भरतीत एका पदासाठी बरेच अर्ज येतात. विद्यापीठ रोजगाराच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांची भरमसाठ अर्ज शुल्काव्दारे लूट करीत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या कार्यपध्दतीवर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी आक्षेप घेऊन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. उपरोक्त पदांसाठी विद्यापीठाला लेखी परीक्षेचा खर्च नसताना अवास्तव अर्ज शुल्क आकारून उमेदवारांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

उमेदवारांची लूट अन्यायकारक

एका पदासाठी दोन-चारशे अर्ज सहज येतात. मुक्त विद्यापीठातील एका पदासाठी २०० अर्ज गृहीत धरले तरी विद्यापीठातील ६३ पदांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये शुल्क आकारत असल्याने विद्यापीठाला एक कोटी २६ लाख रुपये प्राप्त होतील. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाने बीए. बीकॉम सारख्या मागणी असलेल्या अभ्यासक्रमात ७५ टक्के शैक्षणिक शुल्क वाढ केल्याने विद्यापीठाच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगितले जाते. विद्यापीठाच्या सधन आर्थिक परिस्थितीत तात्पुरत्या व करारनामा पध्दतीवर भरण्यात येणाऱ्या समन्वयक पदासाठी अवास्तव अर्ज शुल्क घेऊन गंगाजळीत भर टाकणे व होतकरू उमेदवारांची लूट करणे निश्चितच अन्यायकारक व अयोग्य ठरेल, असे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी राज्यपाल तथा कुलपतींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.