“हा तर दिल्लीनं राज्याच्या माथी मारलेला महादळभद्री…”, ठाकरे गटाची एकनाथ शिंदे सरकारवर आगपाखड!

“जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या…”

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलनंही करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून सत्तारांच्या या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे. अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यांवरून ठाकरे गटानं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी शिर्डीतील पक्षाच्या मंथन शिबिरात बोलताना ‘सरकारमधील काही आमदारांनी खोके घेतल्याचं बोललं जात आहे. एकाही आमदारानं खोके घेतले नाहीत, असं समोर येऊन सांगितलेलं नाही’, असं म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली आणि त्यांनी इतकी भि***झाली असेल सुप्रिया सुळे, तर तिलाही देऊ”, असं विधान करत सुप्रिया सुळेंवर टीका केली. त्यांच्या याच विधानावरून राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘सामना’मधील अग्रलेखातून ठाकरे गटानं याच मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

“हा बेडूक इकडून तिकडे…”

अब्दुल सत्तार यांच्यावर अग्रलेखातून परखड टीका करण्यात आली आहे. “अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.”मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी केलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांची कन्या व खासदार सुप्रिया यांच्याविषयी बेशरमपणाचे वक्तव्य करताना अब्दुल्लांची जीभ झडली कशी नाही?” अशा शब्गांत अब्दुल सत्तारांना सुनावण्यात आलं आहे.

हे वाचले का?  Prakash Ambedkar : राहुल गांधींवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांची जीभ घसरली, अपशब्द वापरत म्हणाले, “ते आपल्याला..”

गुलाबराव पाटलांवरही टीका

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणेच गुलाबराव पाटील यांनीही ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना त्यांचा ‘नटी’ असा उल्लेख केला. त्यावरूनही अग्रलेखातून तोंडसुख घेण्यात आले आहे. “जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाज गुलाबरावाने ‘नटी’ म्हणून केला. ‘नटी’ हा शब्द त्यांनी कोणत्या अर्थाने वापरला?” असा सवाल यात करण्यात आला आहे.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रशांत दामलेंच्या एका नाट्य प्रयोगासाठी गेले. त्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘या नाटकाचे काय घेऊन बसलात? आम्ही महाराष्ट्रात तीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य घडवलं. त्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या महानाट्याचे पडसाद आजही उमटत आहेत.’’ मुख्यमंत्री बरोबर बोलले. त्यांच्या महानाट्यातील अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या ‘नट’ मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली आहे.हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका करण्यात आली आहे.

हे वाचले का?  आठव्या माळेला भवानी तलवार अलंकार महापूजा; आज होमहवन, पूर्णाहुती उद्या घटोत्थापन

MORE STORIES ON