“हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही…”; अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्यानिमित्त विरोधकांना इशारा

इथे येणाऱ्या नागरिकांना अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी यायचे आहे, असेही रोहित पवार म्हणाले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे मंगळवारी अहिल्यादेवींच्या जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार प्रदीर्घ काळानंतर उपस्थित राहणार आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना निमंत्रित केले आहे. त्याच वेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही जयंतीदिनी चौंडीत होणार आहे. पवार व पडळकर हे विरोधक एकाच ठिकाणी येत असल्याने संघर्ष अटळ ठरण्याची चिन्हे आहेत. याबाबात बोलताना रोहित पवार यांनी हा राजकीय कार्यक्रम नाही असे म्हटले आहे.

हे वाचले का?  Devendra Fadnavis : “उमेदवारी दिलेली नसताना ज्यांनी अर्ज भरलाय…”, बंडखोरांसाठी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

“राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या विचारांची लोक इथे येत आहेत. ज्या पद्धतीने आधी कार्यक्रम होत होते त्याच पद्धतीने आताही कार्यक्रम होणार आहे. एकत्रित पद्धतीने कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न इथल्या ग्रामपंचायत,कर्जत जामखेडच्या नागरिकांनी घेतला आहे. राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे असे एकाच पक्षाकडून म्हटले जात असावे. आमच्या बॅनर्सवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. पण काही बॅनर्सवर त्यांच्या पक्षाचे चिन्ह आहेत. हा राजकीय कार्यक्रम नाही आणि यामध्ये कुणीही राजकारण आणू नये,” असे एबीपी माझासोबत बोलताना रोहित पवार म्हणाले.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका

“इथे येणाऱ्या नागरिकांना अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी यायचे आहे. सर्व एकत्रित आल्यानंतर कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी सर्व नागरिक प्रयत्न करतील. हा कार्यक्रम चांगला व्हावा एवढंच आमच्या सर्वांचे म्हणणे आहे,” असेही रोहित पवार म्हणाले.