संभाजीनगर येथे वज्रमूठ या सभेत अजित पवारांनी भाजपा आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्याने देशभरात गदारोळ सुरु आहे. त्याच्या प्रत्युत्तरात शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपाने ‘सावरकर गौरव यात्रा’ राज्यभर आयोजित केली आहे. या यात्रेवरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्यावर दातखीळ बसली होती का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
“तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. सरकारमधील मंत्री, प्रवक्ते आणि आमदारांनीही बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करण्याचं काम केलं. तेव्हा दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत,” असं अजित पवारांनी म्हटलं.
“गौरव यात्रा काढण्याचं आठवत आहे. तुमच्यात धमक आणि ताकद असेल, तर केंद्रात तुमच्या विचारांचं सरकार आहे. राज्यात तुम्ही लोक बसत आहात. सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हालाही अभिमान असेल, तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न द्या. तुमच्यात हिंमत आहे का?,” असे आव्हान अजित पवारांनी शिंदे-भाजपा सरकारला दिलं होतं. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“हे अजित पवारांनी काकांना का विचारलं नाही? स्वत:चे काका १५ वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्री होते. काका नाहीतर ज्यांच्याबरोबर राहिले ते आका सुद्धा होते. काका आणि आकांना प्रश्न का विचारला नाही, याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं. मग आम्हाला प्रश्न विचारावा,” असं आशिष शेलार म्हणाले.