“…ही हुकूमशाहीची सुरुवात नाही, टोक आहे”, ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर ईडी कारवाईवरून हल्लाबोल केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देशात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपशेल पराभवाचा सामना करावा लागला. तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची सलग तीन दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू आहे. अशा विविध प्रश्नांवर बोलताना संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ईडीच्या कारवाईबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “शिवसेना असो वा इतर कोणताही पक्ष असो, जे लोक परखड भूमिका मांडतात, पक्षवाढीसाठी काम करतात, अशा सगळ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय सूड, राजकीय बदला, राजकीय द्वेष उगवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे, असे प्रकार आणखी काही दिवस सुरूच राहतील.”

हे वाचले का?  CM Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी आधी उरली सुरलेली शिवसेना…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

“केंद्रीय तपास यंत्रणांचा अशाप्रकारे वापर करणे, ही हुकूमशाहीची सुरुवात आहे, असं मी मानत नाही. हे हुकूमशाहीचं टोक आहे. आपली सत्ता टिकवण्यासाठी राजकीय विरोधकांना अशा जुलमी पद्धतीने संपवण्याचं काम हिटलरने सुद्धा केलं नसेल,” अशा शब्दांत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढे म्हटलं की, “जगभरात ज्या लोकशाहीचा डंका वाजवला जातो. भारतीय लोकशाहीचे दाखले दिले जातात, त्या देशात अशाप्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम व्हाव, हा आपल्या स्वातंत्र्याचा पराभव आहे, आणि तो पराभव भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार करतं आहे. त्यामुळे आपल्याला आणखी एक स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही अयोध्याला येत असतो, हनुमानगढीला आम्ही नेहमी जात असतो. कालही मी हनुमानगढीला जाऊन आलोय. हे मंदिर फार मोठं उर्जास्त्रोत आहे. त्यामुळे काहीजण हनुमान चालीसाची पुस्तकं हातात घेऊन आम्हाला राजकारण शिकवत असतात, ते त्यांनी स्वत:पुरतं मर्यादीत ठेवावं, आमचा अंतरात्मा प्रभू श्रीराम आणि हनुमानाचा आहे.”

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : मराठा ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त