१२ ते १७ वर्षे वयोगटासाठी ‘कोव्होवॅक्स’ ; तांत्रिक समितीची शिफारस; लसीकरणात समावेशाची शक्यता

शुक्रवारी या समितीची तांत्रिक उपसमितीने ही लस १२ ते १७ वयोगटासाठी वापरण्यास मान्यता दिली.

नवी दिल्ली : सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोवोवॅक्स लशीचा १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी राष्ट्रीय कोव्हिड-१९ लसीकरण मोहिमेत समावेश करण्यास लसीकरणविषयक तांत्रिक सल्लागार समितीच्या तांत्रिक उपसमितीने मान्यता दिली.  गेल्या वर्षी २८ डिसेंबरला प्रौढांसाठी कोव्होवॅक्सचा वापर गंभीर रुग्णांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी करण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली होती. ९ मार्चला १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी विशिष्ट परिस्थितीत ही लस वापरण्यास मुभा देण्यात आली होती. लसीकरणविषयक तांत्रिक सल्लागार समितीच्या कोव्हिड-१९ साठीच्या कृतिदलाने ‘कोव्होवॅक्स’विषयक माहितीचे विश्लेषण केले व त्याला मान्यता दिली होती. शुक्रवारी या समितीची तांत्रिक उपसमितीने ही लस १२ ते १७ वयोगटासाठी वापरण्यास मान्यता दिली. ‘सिरम’चे संचालक प्रकाशकुमार सिंग यांनी ‘कोव्होवॅक्स’चा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात १२ वर्षांपुढे  वापर करण्यासाठी परवानगी देण्यासाठी नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयास पत्र लिहिले होते.