१७ वर्षांवरील तरुणांना आगाऊ मतदार नोंदणीची संधी

पूर्वी एक जानेवारी किंवा त्याअगोदर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुण मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास पात्र ठरत होते,

नवी दिल्ली : निवडणुकांमध्ये तरुणांचा अधिकाधिक सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने निवणूक आयोग प्रयत्न करत आहे. त्यानुसार आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून १७ वर्षे पूर्ण झालेले तरुण मतदार यादीत आगाऊ नोंदणी करू शकतात. मात्र मतदान करण्याचा अधिकार १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाच मिळणार आहे.

पूर्वी एक जानेवारी किंवा त्याअगोदर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुण मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास पात्र ठरत होते, तर एक जानेवारीनंतर १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी एक वर्षभर प्रतीक्षा करावी लागत होती. निवडणूक कायद्यातील बदलानंतर एक जानेवारी, एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबरला १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना मतदार नोंदणी करता येते.

हे वाचले का?  रतन टाटा यांच्या निधनामूळे वरसोली गावावर शोककळा; जाणून घ्या काय होते रतन टाटांचे अलिबाग मधील वरसोली कनेक्शन

निवडणूक आयोगाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने तरुणांना मतदार आगाऊ अर्ज करण्यासाठी राज्यांमध्ये निवडणूक यंत्रणा तांत्रिकदृष्टय़ा सक्षम करण्याची सूचना केली आहे.

‘‘यापुढे मतदार यादी दर तीन महिन्यांमध्ये अद्ययावत करण्यात येणार असून पात्र तरुणांची त्या वर्षीच्या पुढील तीन महिन्यांत मतदार म्हणून नोंदणी होणार आहे’’, असे निवडणूक आयोगाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?