२० सप्टेंबरला महाराष्ट्रात धुवाँधार; विदर्भासह ‘या’ भागांना मध्यम ते अतिवृष्टीचा इशारा

कमी दाबाचे पट्टे विरल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

सोमवारी म्हणजे २० सप्टेंबरला देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ओडिशा, छत्तीसगढ, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, दक्षिण राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमवारपासून महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि मुंबई क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शुभांगी भुते यांनी सांगितलं की बंगालच्या खाडीवर चक्रवाती परिसंचरण विकसित होत आहे. ते जसंजसं गतीमान होईल, त्याप्रमाणे राज्यामध्ये पावसाला सुरूवात होणार आहे. त्यांनी सांगितलं की सर्वात आधी विदर्भाच्या परिसरात पावसाला सुरूवात होईल. राज्याच्या उत्तर भागात प्रामुख्याने पाऊस होईल पण इतर क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर पालघर, ठाणे आणि मुंबईच्या काही भागातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होणार आहे.

हे वाचले का?  कोकणात माकडांचा उपद्रव वाढला; ३५ लाख खर्च करुन वन विभाग माकडे पकडण्याची मोहीम हाती घेणार

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात २० सप्टेंबरपासून, तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांत २१, २२ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत २० सप्टेंबरपासून तीन ते चार दिवस विजांच्या कडकडाटासह काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत काही भागांत २०, २१ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल