६ दिवसांत ८,७९५ रेमडेसिविरची विक्री

१२०० रुपये प्रति कुपी देण्यास १४ रुग्णालयांतील औषध विक्रेतेही तयार

नाशिक : करोनाबाधितांवरील उपचारात महागडय़ा दरात रेमडेसिविर खरेदी करावे लागू नये म्हणून अन्न, औषध प्रशासनाने मांडलेल्या संकल्पनेला सहा औषध विक्रेत्यांनी प्रतिसाद देऊन १२०० रुपये प्रति कुपी दराने ते उपलब्ध केले. सहा दिवसांत संबंधितांकडून ८७९५ कुप्यांची विक्री करण्यात आली आहे. करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने या औषधाची मागणी वाढत आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या १४ रुग्णालयांतील औषध विक्रेत्यांनी १२०० रुपये दरात ते उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली आहे.

गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांना महागडय़ा दरात औषधांची खरेदी करावी लागत असल्याच्या तक्रारी गेल्या वर्षी झाल्या होत्या. रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा अन्न, औषध प्रशासनाने शासनाने निश्चित केलेल्या दरात ते मिळतील यासाठी काही रुग्णालयात व्यवस्था केली होती. त्या वेळी एक कुपी २३०० रुपयांना मिळत होती. मधल्या काळात रुग्ण कमी झाल्यानंतर शासकीय दराचे बंधन राहिले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. एकूण रुग्णांपैकी २५ ते ३० टक्के रुग्ण हे शासकीय किं वा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील काही रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत.

हे वाचले का?  ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

गतवेळची व्यवस्था कार्यान्वित नसल्याने अन्न औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी रुग्णांना कमीत कमी दरात ती उपलब्ध होईल यासाठी संकल्पना मांडली होती. त्यास सहा विक्रेत्यांनी प्रतिसाद देऊन रेमडेसिविरची १२०० रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री न करण्याचे मान्य केले. दुसरीकडे खासगी रुग्णालयांना स्वत:च्या आवारातील दुकानातून औषधे खरेदीची सक्ती करता येणार नसल्याचे सूचित केले. त्या अनुषंगाने काही रुग्णालयांनी रुग्ण वा नातेवाईक कुठल्याही विक्रेत्याकडून ती खरेदी करू शकतात असे फलक लावले होते.जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यातील ८० टक्के रुग्ण लक्षणे नसणारे वा सौम्य लक्षणे असणारे आहेत. १० ते १५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. गंभीर स्थिती असणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविर दिले जाते. १६ ते २१ मार्च या कालावधीत सहा वितरकांकडून ८७५ कुप्यांची विक्री करण्यात आली. प्रारंभीचे काही दिवस हजारच्या आत असणारी मागणी आता दोन हजारांवर पोहोचली आहे. रविवारी संबंधितांकडून २१२६ कुप्यांची विक्री झाली. ही सर्व विक्री प्रति कुपी १२०० रुपयांनी झाल्याचे अन्न, औषध प्रशासनाने म्हटले आहे.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस

सहा विक्रेते सवलतीत रेमडेसिविर देत असल्याने करोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील औषध विक्रेत्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे आता संबंधितांकडून हे इंजेक्शन १२०० रुपयांत देण्याची तयारी दर्शविली गेली. सोमवारी अन्न, औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात बैठक पार पडली. यामध्ये करोनावर उपचार करणाऱ्या १४ रुग्णालयांतील औषध विक्रेते उपस्थित होते. त्यांनी १२०० रुपये प्रति कुपी दराने ती देण्याचे मान्य केल्याचे माधुरी पवार यांनी सांगितले. ज्यांना रेमडेसिविर हवे असतील त्यांना रुग्ण सकारात्मक असल्याचा अहवाल, डॉक्टरांची चिठ्ठी, रुग्णाचे आधार कार्ड सादर करावे लागणार आहे.

हे वाचले का?  उत्तर महाराष्ट्रात ६५ टक्के मतदान