६५ हजार लोकसंख्येचा मोखाडा तालुका राष्ट्रीयीकृत बँकेविना

नागरिकांना बँक व्यवहारासाठी ३० किलोमीटरचा फेरा

नागरिकांना बँक व्यवहारासाठी ३० किलोमीटरचा फेरा; स्टेट बँकेची शाखा उघडण्याची मागणी

पालघर : आदिवासीबहुल मोखाडा तालुक्यात स्टेट बँकेची शाखा नसल्याने शासकीय, शैक्षणिक आणि इतर कार्यालयीन कामकाजात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. या भागातील नागरिकांना २५ ते ३० किलोमीटर लांब जव्हार येथे जाऊन स्टेट बँकेत व्यवहार करणे भाग पडत आहे.

मोखाडा या सुमारे ६५ हजार लोकसंख्येच्या तालुक्याची एकंदरीत भौगोलिकदृष्टय़ा व्याप्ती आणि प्रगती परिस्थिती पाहता विविध शासकीय कार्यालयांचे कामकाज, व्यापार आणि उद्योग तसेच अनेक व्यवसायांसाठी तसेच वैविध्यपूर्ण शालेय आणि तंत्रशिक्षण विभागासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करणे गरजेचे आहे.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले

सध्या शहरात देना बँक, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच जव्हार अर्बन सहकारी बँकेची शाखा असल्या तरी विविध शासकीय योजना, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर योजनांचा लाभ देण्यासाठी स्टेट बँकेच्या शाखेची गरज असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रोहन चुंबळे आणि इतर संस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केंद्र आणि राज्य सरकार आणि अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार करण्याकरिता शासकीय कार्यालयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  तसेच शासकीय वेतन भत्ते वा आधार कार्डसाठी भारतीय स्टेट बँक यांची रोकड व्यवस्थापन उत्पादनांचा वापर करणे अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मात्र, मोखाडा तालुक्यात भारतीय स्टेट बँक नसल्याने त्याचा लाभ घेणे कार्यालय कर्मचारी आणि इतर लाभार्थ्यांना शक्य होत नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. भारतीय स्टेट बँकेची तालुका ठिकाणी शाखा असणे शासकीय कार्यालयांसाठीही उपयुक्त असणारे आहे. तसेच तालुक्याचा विकास होण्यासाठी आणि सर्वसामान्य आदिवासी जनतेला बँक व्यवहारात चर्चा पर्याय उपलब्ध करून भारतीय स्टेट बँक शाखा उघडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे वाचले का?  Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

सद्य:स्थितीत स्टेट बँकेच्या २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जव्हार शाखेचा येथील नागरिक वापर करीत असून त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीला सामोरे जावे लागत आहे. मोखाडाप्रमाणे विक्रमगड येथेदेखील स्टेट बँकेची शाखा नसल्याने जव्हार स्टेट बँकेच्या शाखेत मोठी गर्दी होत असते. त्यामुळे जव्हार येथील नागरिकांना अनेकदा आपल्या कामासाठी बँकेतील कर्मचारी दोन-तीन दिवसांच्या कालावधीनंतर येण्यास सांगतात, अशी जव्हारच्या ग्राहकांची तक्रार आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

विक्रमगड आणि मोखाडा या तालुका ठिकाणी भारतीय स्टेट बँकेची शाखा उघण्यात यावी ही प्रलंबित मागणी आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

– प्रकाश निकम, गटनेते शिवसेना जिल्हा परिषद, पालघर