८०० कोटी..! : जागतिक लोकसंख्येचा नवा उच्चांक; भारत पुढील वर्षी चीनला मागे टाकण्याचा अंदाज

मंगळवारी जगाच्या लोकसंख्येने ८०० कोटींचा नवा ‘मैलाचा दगड’ पार केला. विशेष म्हणजे यातील १०० कोटी लोकसंख्येची भर ही गेल्या १२ वर्षांमध्ये पडली आहे.

.

पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : मंगळवारी जगाच्या लोकसंख्येने ८०० कोटींचा नवा ‘मैलाचा दगड’ पार केला. विशेष म्हणजे यातील १०० कोटी लोकसंख्येची भर ही गेल्या १२ वर्षांमध्ये पडली आहे. पुढल्या वर्षी भारत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकण्याची शक्यता असली तरी भारताचा लोकसंख्या वाढीचा दर स्थिरावत असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्रांनी नोंदवले आहे.

‘८०० कोटी आशा. ८०० कोटी स्वप्ने. ८०० कोटी शक्यता. आपली वसुंधरा आता ८०० कोटी नागरिकांचे घर आहे,’ अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांनी ट्विट करून हा नवा पल्ला गाठल्याची घोषणा केली. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत झालेल्या सुधारणांमुळे मृत्यूचे घटलेले प्रमाण यामुळे लोकसंख्येने हा टप्पा गाठला असताना त्याच वेळी या आकडय़ापलिकडे बघून मानवतेच्या पातळीवर सामायिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  Israel Iran War: इराण-इस्रायल संघर्ष चिघळणार? भारतीय दूतावासांकडून भारतीयांसाठी ॲडव्हायजरी जारी

भारताच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए)ने म्हटले की, भारताच्या लोकसंख्यावाढीचा वेग नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रजनन दर २.२ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे नमूद करून ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रजनन दरावर नियंत्रण मिळवल्याचे यूएनएफपीएने स्पष्ट केले.

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे ‘ठाणे’

जगाच्या लोकसंख्येने महत्त्वाचा टप्पा गाठला असताना देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला ठाणे जिल्हाही चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एका अहवालानुसार ठाणे जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीचा दर तब्बल ३० टक्के आहे. याचे मुख्य कारण मुंबईपासून जवळ आणि परवडणारी घरे असल्यामुळे अनेक स्थलांतरित नोकरदार ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर अशा ठिकाणी राहणे पसंत करतात. लोकसंख्येमुळे ठाणे हा देशात सर्वात जास्त महापालिका असलेला जिल्हाही बनला आहे.

हे वाचले का?  Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

चीनला मागे टाकणार?

२०२३मध्ये भारत लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. २०२२मध्ये भारताची लोकसंख्ये अंदाजे १४१.२ कोटी असून चीनची लोकसंख्या १४२.६ कोटी आहे. या शतकाच्या मध्यापर्यंत, म्हणजे २०५० सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६६.८ कोटी तर चीनची १३१.७ कोटी होईल, असा अंदाज आहे. कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढल्यामुळे भारताचा लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

हे वाचले का?  PM Modi Russia Visit : Video : ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, पुतिन यांची मिश्किल टिप्पणी ऐकून मोदीही हसले

जोपर्यंत आहे रे आणि नाही रे यामधील दरी कमी होत नाही, तोपर्यंत आपले ८०० कोटी लोकसंख्या असलेले जग हे तणाव, अविश्वास, संकटे आणि संघर्षांने भरलेले राहील.