लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ६९.४५ मतदान झाले होते. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी मतांची टक्केवारी पाचने घसरली. २६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ६४ टक्के मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यांमध्ये सरासरी मतांचा टक्का एकसमान राहिल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांमध्ये ३ वाजेपर्यंत सर्वात कमी ४३.०१ टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये पुढील दोन तासांमध्ये सुधारणा होऊन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतांचा टक्का १० टक्क्यांनी वाढत ५३.५१ टक्क्यांवर पोहोचला. पहिल्या टप्प्यामध्ये ५ मतदारसंघामध्ये सरासरी ६३.७० टक्के मतदान झाले होते.
दुसऱ्या टप्प्यातही संध्याकाळी पाचवाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७७.५३ टक्के मतदान झाले. त्या खालोखाल मणिपूरमध्ये ७६.०६ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशने ५२.७४ टक्के मतांचा नीचांक नोंदवला. पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशात ६१.११ टक्के मतदान झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये बिहारमध्ये ५३.०३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यामध्ये बिहारमध्ये सर्वात कमी ४९.२६ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
दुसऱ्या टप्प्यात केरळमधील २०, कर्नाटकातील १४, राजस्थानमधील १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ८, मध्य प्रदेशातील ७, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, पश्चिम बंगाल व छत्तीसगडमधील प्रत्येकी तीन जागांसाठी तर, जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक अशा १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले.
पश्चिम बंगालमधील तीन मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये मतदानयंत्रांतील बिघाडासंदर्भात सत्ताधारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली. मणिपूरमध्ये मतदानकेंद्रावर काही समजाकंटकांनी गोंधळ घालून मतदान बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
या फेरीतील प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, भूपेश बघेल, शशी थरूर, डी. के. सुरेश, वैभव गेहलोत, भाजपचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, व्ही. मुरलीधरन, अभिनेत्री हेमा मालिनी, अरुण गोविल, तेजस्वी सूर्या, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी आदींचा समावेश आहे.
मतांचा टक्का ( संध्या. ५ वाजेपर्यंत)
आसाम ७०.६६
बिहार ५३.०३
छत्तीसगढ ७२.१३
जम्मू-काश्मीर ६७.२२
कर्नाटक ६३.९०
मध्य प्रदेश ५४.८३
मणिपूर ७६.०६
त्रिपुरा ७७.५३
पश्चिम बंगाल ७१.८४
केरळ ६३.९७
महाराष्ट्र ५३.५१
राजस्थान ५९.१९
उत्तर प्रदेश ५२.७४