“…आता दोन हजारांची नोट बंद, याला काय अर्थ?” मोदी सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची टीका

राज्यातील सद्यस्थितीवरून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत.

दोन हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर कडाडून टीका होते आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपल्या खास शैलीत या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसंच सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नसतं. असं म्हणत राज्य सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. कोल्हापूरमध्ये अजित पवारांची उपस्थिती आहे. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले आहेत अजित पवार?

मागे एकदा सरकारने सांगितलं की ५०० आणि हजाराची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजारांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? आता दोन हजारांच्या नोटा द्या आणि बदलून घ्या. आपल्या देशाने इंदिरा गांधीचा काळ पाहिला, वाजपेयींचा काळ पाहिला, मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तो काळही पाहिला. काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

देशाच्या भल्याकरीता एखादा निर्णय असेल तर आमचं काही म्हणणं नाही. देशहित महत्त्वाचं असतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मी राज्याचं अर्थखातं पाहिलं आहे, राज्याचे अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांनीही काम पाहिलं आहे. एक प्रकारची आर्थिक शिस्त आम्ही ठेवली होती.आमची एवढीच भावना असते की विकास झाला पाहिजे. करोनाचं सावट असताना मी राज्याचा अर्थमंत्रीही होतो. त्यावेळी अँब्युलन्स, करोना व्हॅक्सिनचे डोस, जंबो रुग्णालय यासह आम्ही कमी पडलो नाही. उत्पन्न घटलं होतं पण आम्ही राज्याला पुढे नेत होतो. आज राज्यामध्ये १ लाख कोटींची ३१ मार्चच्या आधीची बिलं देणं बाकी आहे. कुठे पैसे गेले? आर्थिक शिस्त का नाही? असेही प्रश्न अजित पवार यांनी विचारले आहेत. आत्ताच्या राज्य सरकारला ११ महिने झाले. अरे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काय काय केलं हे जनतेला माहित आहे. या वर्षभरात गद्दार शब्द, पन्नास खोके जनतेला पटला आहे. या सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे.

हे वाचले का?  Sanjay Raut : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय? संजय राऊत म्हणाले, “आमचं ठरलंय जो..”

मविआच्या काळात ज्या कामांना स्थगिती दिली होती ती अद्याप उठवलेली नाही. काय कारण आहे? ही काय आमची घरची कामं नव्हती. सत्ता बदलत असते, कुणी कायमचं त्या खुर्चीवर बसत नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं? असं अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारला सुनावलं आहे. अजित पवार असो किंवा कुणीही असो सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नाही. सरकार बदललं तेव्हा आम्हीही कुणाची कामं बंद केली नाहीत असंही अजित पवार म्हणाले.

हे वाचले का?  Manoj Jarange : “आरक्षण घेण्यासाठी आता एकच पर्याय”, मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, “सत्तेत…”

आम्हालाही वाटतं की विकास झाला पाहिजे त्यात दुमत असण्याचं काही कारण नाही. कोल्हापूरचा विकास करत असताना इथली रांगडी माती, इथला निसर्ग या सगळ्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.