जीएसएलव्ही-एफ१२ चे प्रक्षेपण; इस्रोचे आणखी एक यश

सतीश धवन अवकाश केंद्रातून सोमवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जीएसएलव्ही-एफ१२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

पीटीआय, श्रीहरिकोटा

सतीश धवन अवकाश केंद्रातून सोमवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) जीएसएलव्ही-एफ१२ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या अग्निबाणाच्या सहाय्याने एनव्हीएस-०१ हा दिशादर्शक उपग्रहाच्या दुसऱ्या पिढीतील (२जी) उपग्रह नियोजित कक्षेत सोडण्यात यश आले. यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला. या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी या मोहिमेत सहभागी असलेल्या संशोधक आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन केले.

हे वाचले का?  ५६वा व्याघ्रप्रकल्प लवकरच, छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प

सकाळी १० वाजून ४२ मिनिटे या निर्धारित वेळेला २७.५ तासांच्या उलटगणतीनंतर ५१.७ मीटर उंचीच्या आणि तीन टप्प्यांच्या जीएसएलव्ही-एफ१२ या अग्निबाणाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे जीएसएलव्हीचे १५ वे उड्डाण होते. त्याच्या सहाय्याने सोडण्यात आलेला एनव्हीएस-०१ हा दिशादर्शक उपग्रह भारताच्या प्रादेशिक दिशादर्शन प्रणालीमध्ये अधिक सुधारणा करेल. त्याद्वारे अधिक अचूक आणि वास्तव वेळेचे दिशादर्शन समजण्यात मदत होईल.
दुसऱ्या पिढीतील दिशादर्शक उपग्रह मालिका महत्त्वाची समजली जाते. ही जीपीएसप्रमाणे काम करणारी भारतीय प्रादेशिक उपग्रह दिशादर्शक प्रणाली आहे. ही प्रणाली २० मीटर अंतराइतके अचूक अंतर कळवते तसेच ५० नॅनोसेकंदाइतकी अचूक वेळ कळवते.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर भारत सरकारने सहकार्य केलं नाही”, विनेश फोगटचा गंभीर आरोप

जुलैमध्ये गगनयान चाचणीचा प्रयत्न

गगनयान या इस्रोच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी जुलैमध्ये क्रू मोडय़ूलची (चालकदल नियामक) चाचणी घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. तसेच नासाबरोबर सहकार्याने सिंथेटिक अॅपर्चर रडार मिशन सुरू करण्यासाठीही इस्रो प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले