“त्यातल्या त्यात एक बरंय की ‘मातोश्री’ उतरून…”, शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला; मविआच्या जागावाटपावरून टीकास्र!

“मोदींच्या विरोधात सगळे एकत्र यायला लागले आहेत. पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण…!”

पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि त्याआधीच्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडी सुरू झाल्या आहेत. एकीकडे सत्ताधारी शिंदे गट-भाजपा युतीच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये मोठा भाऊ कोण आणि कुणाला किती जागा लढवायला मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी १६ जागांचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात असतानाच संजय राऊतांनी १९ जागांचा दावा केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुंबई दौरा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात टीव्ही ९ ला प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. “त्यातल्या त्यात एक बरंय की मातोश्रीतून खाली उतरून शरद पवारांची भेट घेण्यासाठी जसं सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरेंना जावं लागलं, तसं केजरीवालांची भेट घेण्यासाठी दिल्लीत जावं लागलं नाही”, असं देसाई म्हणाले.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

“उद्धव ठाकरे मातोश्रीतून खाली उतरले आणि सिल्व्हर ओकवर जागावाटपाची चर्चा करायला गेले. ती बैठक झाली आणि बाहेर आल्यावर त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की १६ जागा प्रत्येकी लढवणार. एक दिवसाच्या आत संजय राऊतांनी सांगितलं की आमच्या १९ जागा कायम राहणार. त्यानंतर काहींनी म्हटलं की १९ पैकी १३ खासदार शिंदेंबरोबर केले. त्यामुळे तुम्हाला १९ खासदार मागण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी एकत्र येण्याआधीच कुणाला किती जागा याबाबतीत चर्चा-मतभेद सुरू झाले आहेत”, असं शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

हे वाचले का?  माजी आमदार राजन तेली यांचा भाजपा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

“तुम्ही लिहून ठेवा…”

“तुम्ही लिहून ठेवा, यांचं जागावाटपावर एकमत होणार नाही. स्वत:ला विश्वप्रवक्ते समजणाऱ्यांना एवढंही समजू नये की जे आज आपल्याबरोबर नाहीत, त्याही जागा हे म्हणतात आमच्याच आहेत. याला फारसं महत्त्व नाही”, अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

“विरोधकांच्या एकजुटीचा परिणाम होणार नाही”

दरम्यान, भाजपाविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्याचा परिणाम होणार नसल्याचा दावा शंभूराज देसाईंनी केला आहे. “मोदींच्या विरोधात सगळे एकत्र यायला लागले आहेत. पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. कारण मोदींचं जागतिक स्तरावर नेतृत्व उंचावलं आहे. मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा, तिथल्या लोकांनी आणि भारतीयांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता देशानं मोदींचं नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे कितीही पक्ष एकत्र आले आणि मोदींना आव्हान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी त्याचा देशात परिणाम होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.