पिंपरी-चिंचवड पालिका भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी, संभाजीनगरच्या तीन जणांविरुध्द गुन्हा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी पेपर देताना आढळून आला. संबंधिताकडून प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जात होता.

नाशिक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भरती परीक्षेत बनावट विद्यार्थी पेपर देताना आढळून आला. संबंधिताकडून प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर केला जात होता. छाननीत ही बाब उघड झाली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील तीन जणांविरुध्द येथील उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव

याबाबत नाना मोरे (सदगुरूनगर,पुणे) यांनी तक्रार दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने नोकर भरती प्रक्रिया सुरू आहे. लिपीकसह अन्य पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. नाशिक येथील तोफखाना केंद्र रस्त्यावरील जैन भवन भागातील फ्युचरटेक सोल्युशन येथे ही परीक्षा होती. या केंद्रात अर्जुन महेर हा परीक्षार्थी प्रतिबंधीत इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करतांना आढळला. अधिक चौकशीत तो राहूल नागलोभ याच्या जागेवर बेकायदा परीक्षा देत असल्याचे उघड झाले.

प्रवेश पत्रावर बनावट स्वाक्षरी करून त्याने परीक्षा केद्रात प्रवेश मिळवला. त्याला संशयित अर्जुन राजपूतने परीक्षा केंंद्रावर इलेक्ट्रॉनिक्स उपकरण दिल्याचे समोर आले. या प्रकरणी राहूल नागलोभ, अर्जुन महेर आणि अर्जुन राजपूत (सर्व हनुमान मंदिराजवळ, रामेश्वरवाडी, खेडगाव, छत्रपती संभाजीनगर) या तिघांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैर प्रकारास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक चौधरी करीत आहेत.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता