महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडवण्याची होती योजना! अबुझमाडवरून दोन दिवसांपूर्वीच परतला कुख्यात ‘बीटलू’

ठार झालेला पेरमिली दलम कमांडर बीटलू मडावी महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे.

गडचिरोली : अहेरी-भामरागड तालुक्याच्या सीमेवरील केडमारा जंगल परिसरात रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यात ठार झालेला पेरमिली दलम कमांडर बीटलू मडावी महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडविण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे.

कुख्यात ‘बीटलू’ने पोलीस विभागाला अनेकदा चकमा दिला होता. चार वर्षांपूर्वी २०१९ ला महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच धर्तीवर मोठी कारवाई करण्यासाठी रविवारी केडमारा जंगल परिसरात नक्षलवादी जमले होते. याचे नेतृत्व कुख्यात नक्षली बीटलू मडावी, श्रीकांत आणि वासूकडे होते.

हे वाचले का?  राज्यभरात थंडीची चाहूल, किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली

मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे त्या परिसरात सी ६० जवानांनी विशेष अभियान राबवित या तिघांना ठार केले. मागील दोन वर्षांपासून भामरागड परिसरात ‘बीटलू’ची मोठ्या प्रमाणात दहशत होती. त्याच भागातील रहिवासी असल्याने त्याला परिसराची चांगलीच माहिती होती. निडर आणि हिंसक वृत्तीमुळे त्याला लवकरच पेरमिली दलम कमांडर पद देण्यात आले. त्यांनतर तो अधिकच आक्रमक झाला.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

जाळपोळ, हत्या अशा अनेक प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. ९ मार्च रोजी त्याने पोलीस भरती देणाऱ्या मर्दहुर येथील साईनाथ नरोटे या तरुणाची निर्घृण हत्या केली. मागील आठवड्यात तो एटापल्ली येथे येऊन गेला होता. यादरम्यान त्याने काही भागांची पाहणीदेखील केली. इतकेच नव्हे तर तो पोलिसांवरदेखील नजर ठेवायचा. दोन दिवसांपूर्वी तो अबुझमाड येथून परतला होता. तेथे काही वरिष्ठ नक्षलवाद्यांसोबत मिळून त्याने मोठी हिंसक योजना आखली होती.

महाराष्ट्रदिनी ते मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने नक्षल्यांची योजना निष्फळ ठरली. मर्दिनटोला चकमकीनंतर नक्षलवाद्यांमध्ये नेतृत्व पोकळी निर्माण झाली आहे. त्यात बीटलूसारखा कमांडर गमावणे नक्षल चळवळीला मोठा हादरा समजल्या जात आहे.