यंदा पाऊस सर्वसाधारणच, मोसमात सरासरीच्या ९६ टक्के; जूनमध्ये मात्र कमी पावसाचा अंदाज

र्नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान-निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असून तो ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

पुणे : र्नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान-निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असून तो ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र, यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी वर्तवला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै यांनी जूनचा पावसाचा अंदाज आणि मोसमी हंगामाच्या दीर्घकालीन सुधारित अंदाजाची माहिती शुक्रवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. सध्या र्नैऋत्य मोसमी वारे अंदमान-निकोबारजवळ आहेत. आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल स्थिती असल्याने मोसमी पाऊस ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे डॉ. पै यांनी सांगितले.

हे वाचले का?  Nashik Rain : नाशिकमध्ये सरासरीच्या ९२.०४ टक्के पाऊस

देशभरात पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला. एकंदर सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक, तर मेमध्ये सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तसेच देशभर कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले. देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कमी होते.

‘एल निनो’वर ‘आयओडी’चा उतारा  

सध्या ‘एल निनो’ या घटकासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे पावसाळय़ात ‘एल निनो’ हा घटक सक्रिय होऊन ती स्थिती हिवाळय़ापर्यंत राहू शकते. तसेच हिंदू महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) हा घटक पावसाळय़ात सक्रीय होईल. ‘एल निनो’मुळे पावसावर परिणाम होत असला, तरी ‘इंडियन ओशन डायपोल’ सक्रिय झाल्याने तो परिणाम भरून निघेल. यापूर्वी १९९७मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती, असे डॉ. पै यांनी नमूद केले.

हे वाचले का?  “हिंदुंनो परत जा”, अमेरिकेत मंदिराची विटंबना; दहा दिवसांतील दुसरी घटना

‘आयओडी’ काय आहे?

अरबी समुद्रातील पश्चिम ध्रुव (पश्चिम हिंदी महासागर) आणि इंडोनेशियाच्या दक्षिणेकडील पूर्व हिंदी महासागराचा पूर्व ध्रुव यांच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरक म्हणजे ‘हिंदी महासागर द्विध्रुव’(इंडियन ओशन डायपोल-आयओडी). सध्या ‘आयओडी’ निष्क्रिय आहे, मात्र पावसाळय़ात तो सक्रिय होऊन ‘एल निनो’चा परिणाम भरून काढील, असा अंदाज आहे.

अंदाज काय?

  • मोसमी पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता. 
  • मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीइतका पाऊस पडेल, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी.
  • जूनमध्ये देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता.  
  • जूनमधील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता.
हे वाचले का?  Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, विशेष न्यायालयाचे आदेश; कारण काय?