लष्करी हवाई दलाच्या नव्या चार ब्रिगेड स्थापन करण्याची तयारी; कॅट्सच्या दीक्षांत सोहळ्यात हेलिकॉप्टरसह वैमानिकरहित विमानांची प्रात्यक्षिके

शहरातील गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) संयुक्त दीक्षांत सोहळा शुक्रवारी सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

अनिकेत साठे

नाशिक – युध्दभूमीवर प्रभावी कामगिरीसाठी लष्करी हवाई दलाने (आर्मी एव्हिएशन) उपलब्ध साधन सामग्रीचे एकत्रीकरण करीत एव्हिएशन ब्रिगेडची स्थापना केली आहे. भविष्यात आणखी चार एव्हिएशन ब्रिगेड स्थापन करण्यात येणार असल्याचे आर्मी एव्हिएशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी सांगितले.

शहरातील गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) संयुक्त दीक्षांत सोहळा शुक्रवारी सुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कोम्बॅक्ट एव्हिएटर्स प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणारे २१ वैमानिक, हेलिकॉप्टर प्रशिक्षक म्हणून पात्र ठरलेले आठ आणि मानवरहित विमान संचलन शिक्षणक्रम पूर्ण करणारे आठ असे एकूण ३७ अधिकारी लष्करी हवाई दलात दाखल झाले. यावेळी सुरी यांनी दलाचे बदलते स्वरुप अधोरेखीत केले. गेल्या पाच वर्षात दलात मोठ्या प्रमाणात उपकरणे समाविष्ट झाली. आधुनिक उपकरणांनी रात्री किंवा कमी प्रकाशातील कारवाईतील अडसर दूर झाले आहेत. हल्ला करण्याची क्षमता राखणारे अपाचि हेलिकॉप्टर लवकरच दाखल होत आहे. रुद्र आणि हलक्या वजनाच्या एएलएल हेलिकॉप्टरच्या तुकड्यांनी सहाय्यकारी दलाची ओळख लढाऊ भूमिकेत परावर्तीत झाली. चिता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा देशांतर्गत निर्मिलेल्या हलक्या वजनाच्या एएलएचच्या वेगळ्या श्रेणीतील हेलिकॉप्टरला दिली जाईल. गांधीनगर तळावरील हवाई नियंत्रण कक्षाचे (एटीसी) आधुनिकीकरण पुढील महिन्यात पूर्णत्वास जाईल. पाठोपाठ देशातील लष्कराच्या अन्य तळांवरील एटीसींचे काम होणार असल्याचे सूरी यांनी नमूद केले.

हे वाचले का?  क्रीडाक्षेत्रातील यश देशाच्या प्रगतीचे सूचक! बुद्धिबळपटूंशी भेटीदरम्यान पंतप्रधानांची विविध विषयांवर चर्चा

सुरक्षित उड्डाणासाठी आभासी पध्दतीने (सिम्युलेटर) सरावाची व्यवस्था केली जात आहे. त्या अंतर्गत नव्या सिम्युलेटर यंत्रणाही दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. जुनाट चिता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा देशांतर्गत निर्मिलेल्या हलक्या वजनाच्या एएलएचच्या वेगळय़ा श्रेणीतील हेलिकॉप्टरला दिली जाईल. अतिप्रगत लढाऊ शिक्षणासाठी बंगळुरु येथील रोटरी विंग प्रबोधिनीतील (आरडब्लूए) प्रशिक्षण नाशिकच्या स्कूलमध्ये समाविष्ट झाले. ते कॅट्स अंतर्गत लढाऊ प्रशिक्षण विभाग म्हणून कार्यान्वित झाले. सीमेवरील आव्हाने लक्षात घेऊन प्रशिक्षणात बदल करून नव्या अभ्यासक्रमांची रचना केली जात असल्याचे सुरी यांनी सांगितले. दीक्षांत सोहळ्यात समर प्रसंगाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यात ध्रुव, चिता आणि चेतक हेलिकॉप्टरसह दूरस्थ यंत्रणेमार्फत संचलित केली जाणारी वैमानिकरहित विमाने सहभागी झाली होती.

हे वाचले का?  भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार

सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा सन्मान प्रशिक्षणात लढाऊ वैमानिक शिक्षणक्रमात (कॉम्बॅक्ट एव्हिएटर्स) सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कॅप्टन जीव्हीपी प्रत्युष, हेलिकॉप्टर प्रशिक्षक शिक्षणक्रमातील कामगिरीबद्दल मेजर हर्षित मल्होत्रा आणि मानवरहित विमान संचलनाबद्दल मेजर प्रनीत कुमार व मेजर विवेक कुमार सिंह यांना चषकाने सन्मानित करण्यात आले. तसेच मानवरहित विमान संचलन प्रशिक्षण प्रशिक्षक अभ्यासक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मेजर पल्लव वैशंपायन यांनाही गौरविण्यात आले.

हे वाचले का?  Tirupati Laddu : चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत भाविकाचा गंभीर दावा, VIDEO व्हायरल