‘वज्रमूठ’ कायम राखण्याचेच आव्हान

सभा संपल्यावर महाविकास आघाडीतील नेतेमंडळीची परस्परांवर होणारी टीकाटिप्पणी, मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा आणि स्वबळाचा भाषा करीत असल्याने ही वज्रमूठ निवडणुकीत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असेल.

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरपाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुलात झालेल्या महाविकास आघाडीच्या तिसऱ्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांच्यापासून अजित पवार, अशोक चव्हाण, नाना पटोले ते भाई जगताप या साऱ्यांनीच भाजपला पराभूत करण्याकरिता एकत्र निवडणुका लढण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी सभा संपल्यावर महाविकास आघाडीतील नेतेमंडळीची परस्परांवर होणारी टीकाटिप्पणी, मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा आणि स्वबळाचा भाषा करीत असल्याने ही वज्रमूठ निवडणुकीत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असेल.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे कायमच महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका मांडीत आहेत. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची तोंडे विरोधी दिशांना असतात हे गेल्या महिनाभरात अनेकदा अनुभवास आले. मुंबईतील सभेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मुद्द्याला प्राधान्य मिळणे ओघानेच आले. सर्व निवडणुका एकत्रित लढण्याची भूमिका तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मांडली. पण मुंबईत काँग्रेसने स्वब‌ळावर लढण्याचा कधीच नारा दिला आहे. मुंबईत शिवसेना वा राष्ट्रवादीशी युती करण्यास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा विरोध आहे. तशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच मुंबईत स्वबळावर लढण्यास परवानगी मिळावी, अशी मागणीही त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शरद पवार वा अजित पवार यांच्या विरोधात उघडपणे भूमिका मांडतात. अदानीवरून पटोले यांनी पवार यांनाच लक्ष्य केले होते. तसेच अजित पवार आणि पटोले यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू असतात. अलीकडेच अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातही शाब्दिक चकमकी उडाल्या. कोण संजय राऊत, असा सवाल पवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांची भालमण केली असली तरी उभय नेत्यांमध्ये सारे काही आलबेल नाही हा संदेश गेला आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा हासुद्धा वादाचा मुद्दा आहे. प्रत्येक पक्षाला आपला मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते.

हे वाचले का?  Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश अन् उमेदवाऱ्याही जाहीर; ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना अप्रत्यक्ष इशारा?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त करीत असले तरी जागावाटप हा अत्यंत कळीचा मुद्दा असेल. राष्ट्रवादी नेहमीच काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने जादा जागांवर दावा केल्यास काँग्रेस आघाडीत सहभागी होईल का, असे अनेक मुद्दे आहेत. यामुळेच एकत्र लढण्याचा निर्धार वज्रमूठ सभांमधून होत असला तरी ही वज्रमूठ कायम राखण्याचे आव्हान सोपे नाही.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा