विहिरी कोरड्या, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची २ किमी पायपीट, म्हणाल्या, “आमच्या गावात…”

नाशिकच्या बोरधापाडा गावातील आदिसावी महिला गेल्या महिन्याभरापासून हंडाभर पाण्यासाठी दोन किमीची पायपीट करत आहेत.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. विहिरी कोरड्या पडल्या असल्याने ग्रामीण भागातील महिलांना मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे. अशातच, नाशिकच्या बोरधापाडा गावातील आदिसावी महिला गेल्या महिन्याभरापासून हंडाभर पाण्यासाठी दोन किमीची पायपीट करत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

राज्यातील अनेक भागात एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. धरणातील साठा संपणे, विहिरी कोरड्या पडणे, पाण्याचे अपुरे नियोजन, टँकर लॉबी आदी विविध कारणांमुळे राज्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात गावोगावी टँकर उभे राहिलेले दिसतात. मात्र, ज्यांना टँकरने पाणी घेणे खर्चिक असते तिथे पाण्याच्या दुसऱ्या स्त्रोताचा पर्याय शोधला जातो. नाशिकच्या बोरधापाडा येथील आदिवासी महिला हंडाभर पाण्यासाठी तब्बल २ किमीची पायपीट करत आहेत. गावापासून २ किमी अंतरावरील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतील पाणी घेण्यासाठी गावातील महिला भर उन्हातून वणवण करत आहेत. काहीवेळा अपघात होऊन या महिला जखमीही होतात.

हे वाचले का?  तेल, डाळ, पिठाच्या दरवाढीने बहिणींना दिवाळी महाग, जितेंद्र आव्हाड यांची महायुतीवर टीका

“आमच्या गावात दोन विहिरी आहेत. परंतु, दोन्ही कोरड्या झाल्या आहेत. त्यामुळे २ किमी अंतरावर असलेल्या डोंगराच्या पायथ्यापाशी असलेल्या विहिरीतून आम्हाला पाणी आणावं लागतं. प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर मुबलक पाणी द्यावं”, अशी मागणी येथील स्थानिक आदिसावी समाजातील महिलांनी केली आहे.

२०२२ मध्ये केलेल्या भूजल सर्वेक्षणातून असं समोर आलं होतं की, पुणे, नाशिक, धुळे, जळगांव, नंदूरबार आणि अमरावती जिल्ह्यांतील २१३ गावांत एप्रिलपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. तसंच, सप्टेंबर महिन्यात भूजळ पातळीत घट झाली होती. तसंच, २०२१ मध्ये पाऊस २० टक्क्यांनी कमी झाला होता. त्यामुळे या भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.