आधुनिक जीवनशैलीत तणावमुक्तीसाठी विपश्यना आवश्यक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

विपश्यना ही प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी असून या विपश्यनेमुळे आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव दूर ठेवता येऊ शकतात.

वृत्तसंस्था, मुंबई

विपश्यना ही प्राचीन भारताची आणि आधुनिक विज्ञानाची अनोखी देणगी असून या विपश्यनेमुळे आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव दूर ठेवता येऊ शकतात. अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळय़ांनाच विपश्यनेमुळे आयुष्यातील तणावाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विपश्यना शिक्षक एस.एन. गोएंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात दृकश्राव्य माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विपश्यना विषयाचे महत्त्व विषद केले.

हे वाचले का?  Ranji Trophy Final 2024: रणजी ट्रॉफी मुंबईचीच! विदर्भला नमवत रहाणेच्या शिलेदारांनी ८ वर्षांनी पटकावले जेतेपद

ते म्हणाले की, विपश्यना किंवा ध्यानधारणा याकडे एकेकाळी त्याग किंवा संन्यासाचे माध्यम म्हणून पाहिले जात होते. मात्र, आजच्या व्यवहारी जगात विपश्यनेकडे व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग म्हणून पाहिले जाते. विपश्यनेमुळे कसे लाभ होतात त्याचे पुरावे आधुनिक विज्ञानाच्या मानकांनुसार सगळय़ा जगासमोर आणण्याची गरज असल्याचे मतही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या जीवनात ताण आणि त्यामुळे येणारे नैराश्य यांचा प्रत्येकाला अनुभव येत असतो. मात्र विपश्यनेच्या शिकवणीतून या ताण-तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यास मदत होत असते असे पंतप्रधांनांनी सांगितले.

हे वाचले का?  धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार

‘गोएंका यांची शिकवण प्रेरणादायी’

एस. एन. गोएंका हे ‘एक आयुष्य एक ध्येय’ या उक्तीचे समर्पक उदाहरण आहेत. विकसित भारताच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू असताना गोएंका यांची शिकवण आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. गौतम बुद्धांच्या प्रेरणेने गोएंका गुरुजी म्हणायचे की जेव्हा मोठय़ा संख्येने लोक एकत्र येऊन ध्यानधारणा करतात तेव्हा त्याचा परिणाम खूप प्रभावी असतो. अशी एकतेची शक्ती हीच विकसित भारताचा महान आधारस्तंभ आहे, असेही कौतुकोद्गार पंतप्रधानांनी काढले.